ठाणे - कल्याण तालुक्यातील टिटवाळा परिसरातील खासगी शाळांनी शासन निर्णय धाब्यावर बसवून आपली दुकानदारी सुरू आहे, असा आरोप करत टिटवाळा एज्युकेशन कल्याणकारी फाउंडेशनने खासगी शाळांच्या मनमानीला चाप लावून कारवाईची मागणी केली होती. याबाबत शिक्षण उपसचिव, शिक्षणमंत्री, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी तसेच संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा केला. मात्र काहीच कारवाई न झाल्याने शासनच्या भूमिकेच्या निषेधार्थ फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय देशेकर यांनी आज मंत्रालयाबाहेर मुंडन आंदोलन करत शासनाच्या भूमिकेचा निषेध नोंदवला.
मांडा - टिटवाळा परिसरातील खासगी शाळांनी शासन निर्णय धाब्यावर बसवून मनमानी पद्धतीने कारभार करत शिक्षणाच्या नावाखाली पालकवर्गास वेठीस धरले आहे. या शाळांमध्ये नियमबाह्य पद्धतीने केलेली फी वाढ, एकाच बांधलेल्या प्रकाशनाची पुस्तके, शालेय साहित्य शाळेत विकण्यास बंदी असताना सर्रासपणे शाळेतच शालेय साहित्याची सुरू असलेली विक्री, अनेक शाळांना खेळाची मैदाने नसताना देखील त्यांना मान्यता देण्यात आल्या आहेत.
शाळा मान्यता देण्याचे निकष देखील डावलले गेले आहेत. खासगी शाळाच्या मनमानी कारभारा विरोधात टिटवाळा एज्युकेशन कल्याणकारी फाउंडेशनच्या वतीने लढा सुरू असून फाउंडेशनचे अध्यक्ष विजय देशेकर यांनी शिक्षण उपसचिव, शिक्षणमंत्री जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून अशा शाळांवर कारवाईची मागणी केली होती. मात्र सातात्याने तक्रारी निवेदने आंदोलने करून ही शासनाकडून काहीच कार्यवाही झाली नाही. उलट शासनाच्या अधिकाऱ्यांकडून या खासगी शाळांना पाठिशी घालण्याचे काम सुरू असल्याचा आरोप देशेकर यांनी केला आहे.
येत्या २० जून पर्यंत शासनाच्या नियम डावलून गोर गरीब पालकांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या शाळाविरोधात कारवाई करावी अन्यथा. येत्या २० जून २०१९ ला मी व माझ्या टिटवाळा एज्युकेशन कल्याणकारी फाउंडेशनचे सहकारी मंत्रालयासमोर मुंडन आंदोलन करणार असा इशारा विजय देशेकर यांनी निवेदनाद्वारे शिक्षण उपसंचालकांना दिला होता. मात्र त्यानंतरही काहीच कारवाई न झाल्याने अखेर देशेकर यांनी मंत्रालयाबाहेर मुंडन आंदोलन करत सरकारच्या भूमिकेचा निषेध नोंदवला.