मुंबई - सर्वात जुनी बाजारपेठ म्हणून झवेरी बाजार सुप्रसिद्ध आहे. पण ही बाजारपेठ मुंबईबाहेर हलवण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका जाहीर कार्यक्रमात दिले आहेत. मात्र, झवेरी बाजार स्थलांतरीत केल्यास त्याची मुख्यमंत्र्यांना किंमत मोजावी लागेल, असा इशारा सुवर्ण कारागीर समितीचे अध्यक्ष राजाराम देशमुख यांनी दिला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत सुवर्ण कारागीर समितीची भूमिका राजाराम देशमुख यांनी मांडली.
'झवेरी बाजार स्थलांतर केल्यास मुख्यमंत्र्यांना किंमत मोजावी लागेल' - आमदार
झवेरी बाजार मुंबईबाहेर हलवण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका जाहीर कार्यक्रमात दिले. मात्र, झवेरी बाजार स्थलांतरीत केल्यास त्याची मुख्यमंत्र्यांना किंमत मोजावी लागेल, असा इशारा सुवर्ण कारागीर समितीचे अध्यक्ष राजाराम देशमुख यांनी दिला आहे.
‘‘मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबईत २१ एकर जमीन देत सुवर्णकारांसाठी नवे हब उभारत असल्याचे सांगितले. त्यांच्या या निर्णयाचे स्वागतच आहे. मात्र झवेरी बाजारामधील सुवर्णकार आणि कारागीरांना नवी मुंबई येथे स्थलांतरीत करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या याच धोरणाला सुवर्णकार आणि कारागीरांचा विरोध आहे.’’ मुख्यमंत्र्यांनी विरोध झुगारुन स्थलातरांचा घाट घातल्यास येत्या निवडणुकीत १ लाखाहून अधिक कारागीर आणि सुवर्णकार मतपेटीतून आपला रोष व्यक्त करतील, असा इशारा राजाराम देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
स्थानिक आमदार आणि खासदार यांनाही सुवर्णकार आणि कारागीरांना वारंवार विनंती अर्ज केले आहेत. मात्र बिल्डरधार्जिण्या नेत्यांमुळे झवेरी बाजारचा बळी दिला जात आहे. बाजार स्थलांतरीत केल्यास सुवर्णकारांवर उपासमारीची वेळ येईल. झवेरी बाजारमधील ग्राहकवर्ग खरेदीसाठी नवी मुंबईला येणार नाही, असे देशमुख यांनी सांगितले.