मुंबई - 'उभं आयुष्य मी राजकारण केले. ४० वर्ष सतत निवडून आलो. मात्र, माझ्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाने मला वेदना झाल्या आहेत. त्यामुळे मी भ्रष्ट, नालायक आमदार आहे, हा शिक्का घेऊन मला बाहेर जायचे नाही, अशा शब्दात माजी मंत्री एकनाथ खडसेंनी त्यांच्या मनातील खदखद आणि भावनांना विधानभवनात वाट मोकळी करुन दिली.
माझ्यावर सभागृहाच्या बाहेर आरोप केले होते. माझ्यावरील आरोपाची चौकशी करण्याची मीच मागणी केली होती. दाऊदच्या बायकोशी बोलण्याचा माझ्यावर आरोप होता. पारदर्शी सरकारने चौकशी केली. माझ्यावर आरोप करणारा हॅकर मनीष भंगाळे कुठे आहे ते सांगा? माझ्या पीएने ३० लाखाची लाच घेतल्याचा आरोप खोटा निघाला. मी एक इंचही जागा घेतली नाही तरी आरोप झाले. दमानिया बाई रोज आरोप करायची. लाचलुचपत आणि आयकराची चौकशी झाली. मी पाटलाचा पोरगा असल्यामुळे शेती व्यतिरिक्त माझा दुसरा उद्योग नाही. शैक्षणिक संस्था नाही, असे खडसे म्हणाले.