मुंबई - भायखळ्याच्या डोंगरी परिसरात चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान मृत्यू झालेल्यांमध्ये एकाच कुटूंबातील दोन व्यक्तींचा समावेश आहे.
डोंगरी दुर्घटनेत एकाच कुटूंबातील दोघांचा मृत्यू - साबिया निसार शेख
मुंबईतल्या डोंगरी भागातील केसरबाई ही चार मजली इमारत आज सकाळी साडेअकरा वाजता कोसळली. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत ८ जण दगावले आहेत. या मृतांमध्ये शेख कुटुंबातील दोघांचा समावेश आहे.
साबिया निसार शेख (25)आणि अब्दुल सत्तार शेख (55) अशी मृतांची नावे आहेत. साबियाचं सहा वर्षांपूर्वीच लग्न झालं होतं. साबियाला एक मुलगा आणि तीन महिन्यांची मुलगी आहे. मुलीचं नाव आयेशा आणि मुलाचं नाव अब्दुल असून या दोघांवर सध्या जे. जे. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या दोन्ही मुलांच्या डोक्यावरुन मायेचं छत्र हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अब्दुल सत्तार हे डेकोरेटर होते. ते सकाळी कामावर जायला निघाले असताना त्यांना इमारतीत काहीतरी गडबड होत असल्याचे जाणवले. त्यानंतर त्यांनी तात्काळ घराबाहेर पळण्याचा प्रयत्न केला परंतू तोपर्यंत त्यांच्या अंगावर सगळं घर कोसळलं होतं, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. अब्दुल सत्तार यांची पत्नी सलमा शेख हिच्या कानाला मार लागला असून तिच्यावर सध्या जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.