मुंबई- दुष्काळी जिल्ह्यांमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत जास्तीत जास्त कामे सुरू करा, ३ दिवसात कामांना मंजुरी द्या, असे निर्देश आज (शुक्रवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
दुष्काळाची स्थिती आणि उपाययोजना यासंदर्भातील संवादामध्ये आज मुख्यमंत्र्यांनी ऑडियो ब्रीजच्या माध्यमातून अहमदनगरचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याशी संवाद साधला. 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी यावेळी राज्याचे मुख्य सचिव यु.पी.एस. मदान, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
२०१८ च्या लोकसंख्येप्रमाणे अतिरिक्त टँकरची मागणी
रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाची मागणी करणारे प्रस्ताव प्रलंबित ठेऊ नका, त्यांना तत्काळ मान्यता देऊन कामे सुरू करा. नरेगामध्ये २८ प्रकारची कामे कनव्हर्जन माध्यमातून करता येतील, सरपंचांनी याअंतर्गत जलसंधारणाची अधिकाधिक कामे आपल्या गावात करावीत. तहसीलदारांनी गावातील २०१८ ची लोकसंख्या आणि जनावरांची संख्या विचारात घेऊन अतिरिक्त टँकरची मागणी पडताळून पाहावी आणि त्याप्रमाणे टँकरद्वारे पाणी पुरवठा होईल याची दक्षता घ्यावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
दुष्काळी कामांना आचारसंहिता नाही
पाणी पुरवठा योजनांची थकीत वीज बील देयके शासनाच्यावतीने भरण्यात यावीत. या कारणामुळे बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजना पुन्हा सुरू कराव्यात. दुष्काळी कामांना आचारसंहिता लागू नाही, निवडणूक आयोगाने दुष्काळी कामे करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे आचारसंहितेचे कारण देऊन दुष्काळावरील उपाययोजनांची कामे प्रलंबित ठेऊ नयेत.
तलावातील गाळ काढण्यास तत्काळ मान्यता द्या
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारच्या माध्यमातून तलावांमधील गाळ काढण्यास तहसीलदारांनी तत्काळ मान्यता द्यावी, चारा छावण्यांच्या अडचणी प्रशासनाने दूर कराव्यात, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी रोहयो अंतर्गत कुशल कामांसाठी लवकरच निधी देण्यात येणार असल्याचे सांगितले. अधिग्रहित करण्यात आलेल्या विहिर मालकाला अधिकचा मोबदला देण्यात येत आहे.
अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळ निवारणाच्या प्रभावी उपाययोजना
१. जिल्ह्यातील १३ तालुक्यात ७७२ टँकरने पाणी पुरवठा सुरू
२. पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ जिल्ह्यात ४ नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती.
३. ५४ विहिरींचे अधिग्रहण
४. पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणी पुरवठा योजनांची १०.४९ कोटी रुपयांच्या थकित वीज देयकाची रक्कम भरून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला.
५. जिल्ह्यात ७ तालुक्यात ४९३ शासकीय चारा छावण्या. यामध्ये २ लाख ६७ हजार ५७४ मोठी तर ४१ हजार ९१७ लहान अशी मिळून ३ लाख ०९ हजार ४९१ जनावरे दाखल.
६. दुष्काळ जाहीर केलेल्या ११ तालुक्यातील १२७५ गावातील ६ लाख ३६ हजार ७९० शेतकऱ्यांना ४००.५४ कोटी रुपयांची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा.
७. जिल्हाधिकारी अहमदनगर यांना चारा चालकांची देयके अदा करण्यासाठी ४७ कोटी रुपयांचा निधी वितरित.
८. जिल्ह्यातील एकूण ३ लाख ४९ हजार २९२ शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेंतर्गत नोंदणी केली होती. या हंगामात नुकसान भरपाई पोटी १४७.१५ कोटी रुपयांची रक्कम अदा करण्यात येणार आहे. त्यापैकी ९० कोटी रुपयांची रक्कम १ लाख ६५ हजार ४४९ शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे.
९. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २.७२ लाख शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी ५८ हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी २ हजार रुपये या प्रमाणे पहिल्या हप्त्यापोटी ११.५६ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले. उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरू आहे.
१०. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात ८८६ कामे सुरू. त्यावर ७५१२ मजुरांची उपस्थिती.