बुलडाणा -नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी आपसी मतभेद विसरून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार ग्रामविकासासाठी पैसा कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्ह्यातील चिखली येथे दिली. त्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कारासाठी चिखली येथे आज आल्या होत्या.
माहिती देताना महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हेही वाचा -बुलडाण्यातील मराठा अर्बन पतसंस्थेच्या अध्यक्षासह तिघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल
जिल्ह्यातील 527 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीपैकी 29 ग्रामपंचायतींच्या निवडणुका अविरोध झाल्या, तर उर्वरित 498 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सोहोळा महाविकास आघाडीच्या वतीने चिखली येथे आज आयोजित करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार यशोमती ठाकूर यांच्या हस्ते झाला.
ग्रामीण भागाच्या विकासासाठी विविध योजना आखल्या जात आहे
ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीच्या वतीने विविध योजना आखल्या जात आहे. या योजनांच्या माध्यमातून या ग्रामपंचायत सदस्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन यशोमती ठाकूर यांनी केले.
नियोजन समितीच्या माध्यमातून जास्त पैसा ग्राम विकासाला देणार
यावेळी मार्गदर्शन करताना अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणूक ग्रामपॅनेलच्या माध्यमातून लढविल्या जात असल्यामुळे या निवडणुकीमध्ये पक्षाचा संबंध येत नाही. अनेक लोक आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार विजयी झाले असा दावा करत आहे. परंतु, मी तसा दावा करणार नाही, असे सांगून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जास्तीत जास्त पैसा ग्राम विकासाच्या दृष्टीकोनातून देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी व्यासपीठावर बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार राजेश एकडे, माजी आमदार, तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, हर्षवर्धन सपकाळ, जिल्हा परिषद अध्यक्ष मनीषा पवार उपस्थित होत्या. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा -शेगावात रस्ते कामाकरिता 52 घरे जमीनदोस्त; 150 पोलिसांच्या बंदोबस्तात कारवाई