बुलडाणा - गावात सुरू असलेले अवैद्य दारू आणि इतर धंदे बंद करण्यासाठी महिलांनी पोलीस ठाणेच गाठले. जळगाव जामोद तालुक्यातील गाळेगाव खुर्द येथील महिलांनी काल (शुक्रवारी) 27 डिसेंबरला पोलीस ठाण्यात मोर्चा काढला. यावेळी या महिलांनी पोलीस ठाणेदार यांनी निवेदन दिले. तसेच जोपर्यंत गावात अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस ठाण्याचा परिसर सोडणार नाही, अशी भूमिका घेतली. महिलांच्या या भूमिकेमुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती. यावेळी महिलांनी पोलीस प्रशासनावर हप्ते घेण्याचे थेट आरोप केले. तसेच 'साहेब तुमचे हप्ते बंद करा आणि आमचे कुटुंब वाचवा' अशी विनवणी केली.
आमच्या गावामध्ये सर्व गावकरी गुण्या-गोविंदाने राहत असत. तसेच गावामध्ये कोणालाही व्यसन नव्हते. त्यामुळे गाव तंटामुक्त होते. गावामध्ये कोणतीही अप्रिय घटना घडत नव्हती. त्यामुळेच गावाला महात्मा गांधी तंटामुक्त पारितोषिक सुद्धा मिळाले. गावामध्ये आर्थिक, सामाजिक, धार्मिक सलोखा होता. मात्र, गावातील काही समाज कंटकानी गावामध्ये अवैध दारूविक्री, जुगार आणि वरली मटक्याचा व्यवसाय सुरु केला आहे. या व्यसनाधीनतेमुळे सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता धोक्यात आलेली आहे. तसेच इतर शेजारील गावामध्ये उपरोक्त अवैद्य धंदे बंद असल्याने ते सर्व व्यसनाधीन आमच्या गावामध्ये येतात. त्यामुळे हे गाव व्यसनाधीन लोकांचे केंद्र झालेले आहे, अशी व्यथा या महिलांनी पोलिसांकडे मांडली.
हेही वाचा -मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, पोलिसांची दमछाक