बुलडाणा - संत नगरी असलेल्या शेगावची अख्यायिका खरी ठरणार का? हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. शेगावामध्ये संत गजानन महाराजांचे वास्तव्य असल्याने राज्यातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून दररोज हजारो भक्त येथे माथा टेकूण आपल्या इच्छा आकांशा व्यक्त करतात. या भाविकांमध्ये राजकीय मंडळींची संख्याही कमी नाही. मात्र, राजकारणातील एक पद असे आहे की, तो पदाधिकारी येथे आला तर त्याचे पद कुठल्या ना कुठल्या कारणाने जातेच. असा समज आता मागील इतिहास पाहता दृढ होत चालला आहे.
शेगावची आख्यायिका बाबत राजकारणात झालेली उलथापालथ पाहता पुन्हा चर्चेला उधाण आले आहे. या चर्चेचे मुख्य कारण आहे ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात आचारसंहीता लागू होण्यापूर्वी शेगावात पोहोचून गजानन महाराजांचे दर्शन घेतले होते. येथे झालेल्या सभेत 'मी पुन्हा येईल' अशी घोषणा सुद्धा त्यांनी केली होती. मात्र, आज त्यांच्या मुख्यमंत्री पदावर संकट कोसळल्याचे चित्र दिसत आहे.
शेगावला काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या भव्य महाआरोग्य शिबिराला देवंद्र फडणवीस आले होते. पण ऐनवेळी व्यस्त शेड्यूल्डचे कारण समोर करून शेगावला येण्याचे टाळले होते. मात्र, समज गैरसमज काहीही असले तरी जनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस शेगावला आले. मात्र, ही यात्रा बुलडाणा जिल्ह्यात येताच होताच भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज यांचे निधन झाले. त्यामुळे शेगावला पोहोचण्याआधीच जनादेश यात्रा स्थगित करण्यात आली होती. त्यांनतर पुन्हा ही यात्रा याच जिल्ह्यातून सुरु होणार होती. ज्या दिवशी ही यात्रा सुरु झाली त्याच दिवशी भाजप नेते अरुण जेटली यांचे निधन झाले होते. तेव्हा नांदुऱ्यावरून ही यात्रा शेगावात पोहोचली. शेगावमधील सभेत कुठलेही राजकीय भाषण न करता मी पुन्हा येईल असे सांगून फडणवीस निघून गेले. आणि तेव्हापासूनच चर्चेला उधाण आले की, फडणवीस आता मुख्यमंत्री म्हणून पुन्हा येणार नाहीत.