बुलडाणा - दीड महिन्यात बुलडाणा जिल्ह्यात सरासरी 48.57 टक्के मिलिमीटर पाऊस पडला असून जिल्ह्यातील लहान-मोठया 105 प्रकल्पात आतापर्यंत 13.60 टक्के जलसाठा जमा झाला आहे. तर मोठा प्रकल्प खडकपूर्णा आणि मध्यम प्रकल्प कोराडीमध्ये मृतसाठाच शिल्लक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प अद्यापही तहानलेले असून येणाऱ्या काळात दमदार पाऊस झाला नाही, तर पाणी टंचाईचे मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात तीन मोठे प्रकल्प असून यात नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा प्रकल्पांचा समावेश आहे. तर सात मध्यम प्रकल्प असून ९८ लघु प्रकल्प आहेत. या 105 प्रकल्पात अद्यापही पाहिजे त्या प्रमाणात जलसाठा जमा झाला नसून आतापर्यंत फक्त 13.60 टक्के जलसाठा जमा झाला आहे. जिल्ह्यात 3 मोठे प्रकल्प असून त्यात नळगंगा 9.17 टक्के, पेनटाकली - 22.08 टक्के जलसाठा असून खडकपूर्णामध्ये 26.23 दलघमी मृतसाठा शिल्लक आहे. तर मध्यम प्रकल्पामधून कोराडी मध्येही 4.00 दलघमी मृतसाठा शिल्लक आहे.