बुलडाणा- उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील दुसऱ्या क्रमांकाचे लोणार येथील खाऱ्या पाण्याचे सरोवराचे पाणी अचानकपणे मंगळवारी संध्याकाळी गुलाबी, लालसर झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. लोणार तहसीलदार सैदल नदाफ यांनी मंगळवारीच घटनास्थळी जावून पाहणी करून हा प्रकार कसा घडला, यासंदर्भात संबधीत वनविभागाला सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे लोणार सरोवरामध्ये हिरव्या रंगाचे खारे पाणी असल्याने अचानकपणे पाण्याच्या रंगामध्ये बदल झाल्याने याचे संशोधन सुरू आहे.
आश्चर्य: लोणार सरोवराचे पाणी गुलाबी; तर्क-वितर्काला उधाण.. - लेटेस्ट न्यूज इन बुलडाणा
लोणार येथील खाऱ्या पाण्याचे सरोवराचे पाणी अचानकपणे मंगळवारी संध्याकाळी गुलाबी, लालसर झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. लोणार सरोवर हे महाराष्ट्रामधील खाऱ्या पाण्याचे जगातील तिसरे व देशातील पहिले सरोवर आहे. सरोवरातील पाणी खारे असून त्याचा रंग हिरवा आहे. मात्र, पाण्याचा रंग गुलाबी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
आधी कोरोना, मग टोळधाड, नंतर चक्रीवादळ, भूकंप अशा नैसर्गिक संकटांच्या मालिकेत सरोवराचे पाणी गुलाबी झाल्याने आणखी कुठल्या संकटाचे संकेत देत आहे का ? या दिशेनेही काही जिज्ञासूकडून तर्कवितर्क लावल्या जात आहेत. बुलडाण्यापासून ८९ किमी अंतरावर असणारे लोणार सरोवर हे महाराष्ट्रामधील खाऱ्या पाण्याचे जगातील तिसरे व देशातील पहिले सरोवर आहे. याची निर्मिती एका उल्कापातामुळे ५० हजार वर्षांपूर्वी झाली असल्याचे मानले जाते. हे सरोवर बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती सरोवर आहे. सरोवरातील पाणी खारे असून त्याचा रंग हिरवा आहे. हे सरोवर 'अ' वर्गाचे तीर्थक्षेत्र म्हणून घोषित असून सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार सरोवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे.
या सरोवरच्या पाण्याच्या रंगामध्ये मंगळवारी अचानकपणे बदल झाला. गुलाबी व फिकट गुलाबी पाण्याचा रंग झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सैदल नदाफ यांनी घटनास्थळी जावून पाहणी करून पाण्याच्या रंगाचे व्हिडिओ, फोटो आपल्या मोबाईलमध्ये घेवून वनविभागांना हा प्रकार कशामुळे झाल्या याचा तपास करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. तर लोणार शहरातील सांडपाणी व पावसाचे पाणी सरोवरात गेल्याने गडुळ पाणी झाल्याची चर्चा शहरात करण्यात येत आहे. मात्र शहरातील सांडपाणी व पावसाचे पाण्यामुळे सरोवरातील पाण्याचा रंग बदलला नसल्याचे तहसीलदार सैदल नदाफ यांचे म्हणणे आहे. तर पाण्याचा रंग कशामुळे बदलला याची चौकशी करण्यात येत आहे.