बुलडाणा -जिल्ह्यातील बहुतांश गावात पाणी प्रश्न गंभीर झाला आहे तर अनेक गावात पाणीबाणी निर्माण झाली आहे. शेगाव तालुक्यातील चिंचोली गावासाठी प्रशासन उदासीन असून गावात स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत एकही पेयजल योजना राबवली गेली नाही. त्यामुळे भीषण पाणी टंचाईमुळे जीवघेणी कसरत करावी लागत आहे.
शेगाव तालुक्यापासून पाच किलोमीटर अंतरावर चिंचोली हे गाव आहे. चिंचोलीची लोकसंख्या पाच हजारच्या आसपास आहे. या गावात आजपर्यंत शासनाच्या माध्यमातून एकही पेयजल योजना राबविली गेलेली नाही. त्यामुळे गावात नेहमी पाणी टंचाई असते. गावात पाण्याचा पर्यायी स्रोत म्हणून विहिरी आणि हातपंप आहेत. मात्र, त्यांना फक्त पावसाळ्यातील तीन महिनेच पाणी असते. त्यावरही संपूर्ण गावाची तहान भागत नाही. म्हणून बाराही महिने तात्पुरती सुविधा म्हणून टँकरने पाणी पुरवठा केला जातो. तर हिवाळा आणि उन्हाळ्यात गावात टँकरच्या दोनच फेऱ्या होत असल्याने हंडाभर पाण्यासाठी गावकऱ्यांना जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे. टँकरमधले पाणी नाही मिळाले तर हंडाभर पाण्यासाठी कोसो दूर भटकंती करावी लागते. टँकर गावात येण्याआधी एक किलोमीटर पासूनच गावातील लहान मुले आणि पुरुष टँकरमध्ये पाईप टाकण्यासाठी गर्दी करतात.
विद्यार्थांच्या शैक्षणिक भविष्यावर परिणाम
पाण्यासाठी कामधंदे सोडून कुटुंबातील सर्वांनाच पाण्यासाठी घरी थांबावे लागते. त्यामुळे आर्थिक दुष्काळ तर आहेच पण याचा परिणाम विद्यार्थांच्या शैक्षणिक भविष्यावर देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. शिवाय दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने गावातील लोकांना मुत्राशयाचे आजार जडले आहेत. तर एका तरुणाचा जीवही गेला आहे. तर गावाच्या एक किलोमीटर अंतरा पर्यंत वारीच्या धरणातुन नवोदय विद्यालयापर्यंत पाईपलाईन आली आहे. ती पाईपलाईन गावापर्यंत करून गावाचा पाणी प्रश्न कायमचा सुटू शकतो, असेही गावकरी सांगतात.२०११-१२ च्या जनगणनेनुसार गावातील लोकसंख्या २७०० होती त्यानुसार गावात २४ हजार लिटरचे दोन टँकर सुरू आहेत. मात्र, आता गावाची लोकसंख्या ५ हजार पर्यंत गेली असून एवढ्या पाण्यात गावाची तहान भागने अशक्य आहे.त्यामुळे टँकर आले की लोक पाण्यासाठी जीवाची पर्वा न करता टँकर वर अक्षरशः तुटून पडतात. हंडाभर पाण्यासाठी भांडणे ही होतात टँकर.