बुलडाणा - खामगाव - शेगाव रोडवरील महात्मा फुले गृहनिर्माण सोसायटीजवळ असलेल्या भूखंडावरून ३३ किलोव्हॅटची विद्युत वाहिनी गेली आहे. ही विद्युत वाहिनी अनेक वर्षांपूर्वी गेलेली आहे. नियमांनुसार या विजेच्या तारांखाली बांधकाम करण्यास मनाई असून धोकादायक सुद्धा आहे. असे असतानाही शेगाव पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी पदावर राहून आता निवृत्त झालेल्या प्रकाश वाघ यांनी प्लॉट विकत घेऊन चक्क त्या तारांखाली घराचे बांधकाम केले आहे. एव्हढेच नव्हे तर विजेचे खांबही घरात घेऊन विद्युत वहिनीशी छेडछाड करत खांबांचे आधारक तोडले. यासंदर्भात महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी वाघ यांना वेळोवेळो नोटीस देऊनही या मुजोर अधिकाऱ्याने त्यांना दाद दिली नाही. शहर पोलिसांत ६ महिन्यांपूर्वी तक्रार देऊनही पोलिसांनी कारवाई केलेली नाही. यामुळे महावितरण अधिकारी हतबल झाले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी प्रकाश वाघ हा मुजोर अधिकारी कार्यरत होता.
सध्या हा अधिकारी १५ दिवसांपूर्वी सेवानिवृत्त झाला. वाघ यांच्या घराचे बांधकाम खामगाव - शेगाव रोडवरील महात्मा फुले गृहनिर्माण सोसायटीजवळ हंसराज नगर मध्ये सुरू आहे. ज्या ठिकाणी वाघ यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे त्याठिकाणाहून यापूर्वीच ३३ किलोव्हॅट विद्युत वाहिनी गेलेली आहे. नियमानुसार या विद्युत वाहिनीच्या शेजारी किंवा तारांच्या खाली बांधकाम करण्यास सक्त मनाई आहे. शिवाय यामुळे जीवालाही धोका होऊ शकतो.असे असतानांही मुजोर सेवानिवृत्त अधिकारी प्रकाश वाघ यांनी त्याठिकाणी प्लॉट विकत घेऊन घराचे बांधकाम सुरू केले. बांधकाम करत असताना वाघ यांनी चक्क विद्युतवाहिनीचे खांबही त्यांच्या घरात घेतले आणि खांबांचे आधारक तोडून टाकले. आधारक तोडल्याने भविष्यात यामुळे परिसरात राहणाऱ्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच या घरातली लोकांच्या जीवालाही धोका होऊ शकतो. मात्र, याची जाणीव असतानाही या मुजोर अधिकाऱ्याने या विद्युत वाहिनीखाली आपल्या घराचे बांधकाम केले आहे.