बुलडाणा- जिल्ह्यातील अंढेरा पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस कर्मचारी काळी-पिवळी चालकाकडून हफ्ता वसूल करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हप्ता वसुली करणाऱ्या पोलिसाचे राजू चौधरी, असल्याचे समजते. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी उपस्थित असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यामुळे हफ्ता वसुलीला वरिष्ठांचा अभय असल्याची चर्चाही होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे बुलडाणा पोलिसांची प्रतिमा मलिन होत आहे.
पाचशे रुपयांचा मागितला हफ्ता
चिखली ते देऊळगाव राजा या रस्त्यावर अनेक काळी-पिवळी चालक प्रवासी घेऊन जाण्याचा व्यवसाय करतात. या काळी-पिवळी चालकांना अंढेरा पोलीस ठाण्याची हद्द पार करावी लागते. अंढेरा फाट्याजवळ अंढेरा पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस नेहमी वाहनधारकांना त्रास देत असल्याच्या तोंडी तक्रार करण्यात येत होती. तर काळी-पिवळी चालकांना प्रवासी वाहतूक करण्यासाठी दरमहा हप्त्याची वसुली करण्यात येत असल्याचीही चर्चा होती. सध्या कोरोनामुळे काळी-पिवळी वाहनधारकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. तरीही पोलीस त्यांच्याकडून हफ्ता वसूल करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हफ्ता वसुलीला कंटाळून एका काळी-पिवळी चालकाने कर्तव्यावर असणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला 400 रुपये हफ्त्याची रक्कम दिल्याचा व्हिडिओ तयार केला आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हफ्ता वसुली करणाऱ्या वाहतूक पोलिसाचे नाव राजू चौधरी असून त्याने 500 रुपयाची मागणी केली होती. काळी-पिवळी चालकाने 250 रुपये घेण्याची विनवणी केली. मात्र, यावेळी अखेर 400 रुपयाची मागणी करून काळी-पिवळी चालकाकडून 400 रुपयाची हप्ता वसुली केली असल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. शिवाय या ठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारीही असल्याचे व्हिडिमध्ये दिसत आहे. याप्रकरणी वाहतूक पोलीस राजू चौधरी यांना त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्या मोबाईलवर फोन केला असता त्यांनी फोन घेतला नाही.