बुलडाणा - येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या एका मोटार वाहन निरीक्षकाचा वाहनधारकाकडून पैसे घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र, जे पैसे मोटार वाहन निरीक्षकांनी घेतले आहेत. ते लाच नव्हे तर वाहनाला चलान करून, आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम आहे. अशा प्रकारे पैसे घेतानाचा व्हिडीओ व्हायरल करणे, हा खोडसाळपणा असून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. आमच्या खात्याची प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या चालकाचा निषेध करतो. तसेच, वरिष्ठ विभागाकडून जसे निर्देश येतील तशा पद्धतीने आम्ही संबंधीत चालकावर कारवाई करू अशी माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गोपाल वरोकार यांनी दिली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या मोटार वाहन निरीक्षकाचे राजेंद्र निकम असे नांव असून त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला आहे.
काय आहे प्रकार-
फिरते वाहन तपासणी पथकामध्ये ऑगस्ट महिन्यात मोटार वाहन निरीक्षक राजेंद्र निकम यांची ड्युटी असताना 6 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास वाहन तपासणी दरम्यान, त्यांनी (एम एच. 28 एच. 8036) क्रमांकाची तीनचाकी मालवाहू ऑटो रिक्षा तपासणी केली. या दरम्यान, त्याच्याकडे फिटनेस, इंशोरन्स, लायसन्स, रिफ्लेक्टर आणि पियुसीचे कोणतेही कागदपत्रे आढळून आले नाहीत. त्यामुळे या ऑटो रिक्षा धारक शेख रहेमान याला मोटार वाहन निरीक्षक राजेंद्र निकम यांनी सदर ऑटो रिक्षाला चलान म्हणून 9 हजार 700 रुपयांचा दंड केला. तसेच, वाहनधारकाला त्याच ठिकाणी दंड भरण्यास सांगितले. त्यानंतर 9 हजार 700 रुपयांचा दंड ऑटो रिक्षा धारकाने जागेवर मोटार वाहन निरीक्षक राजेंद्र निकम यांच्याकडे भरण्यात आला. यावेळी निकम यांनी आपल्या जवळील पॉस मशिनद्वारे ऑनलाइन दंड भरून घेतले. दरम्यान, दंड भरतेवेळी पैसे मोजत असल्याचा आणि मोटार वाहन निरीक्षक राजेंद्र निकम यांना पैसे देत असल्याच्या व्हिडीओ तयार करून, तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. यामुळे मोटार वाहन निरीक्षकाने लाच घेतली असा गैरसमज पसरला आहे. त्यावर आरटीओ विभागातून खेद व्यक्त करण्यात आला आहे.