बुलडाणा -जिल्ह्यात कालचा दिवस (बुधवार) हा आंदोलनवार ठरला. दिवसभरात शेतकरी संघटनेसह कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी रास्ता रोको, निर्दशने, मोर्चे काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. सकाळी 10 वाजेपासून या आंदोलनांना सुरूवात झाली होती.
बुलडाण्यात बुधवार ठरला 'आंदोलन'वार, विविध संघटनांनी केली निदर्शने.. बुधवारी सकाळपासूनच शेतकरी संघटनेने जिल्ह्यात ठिक-ठिकाणी रास्तारोको करत आंदोलन करण्यास सुरूवात केली होती. तर, जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी महाराष्ट्र वनरक्षक, वनपाल संघटना आणि राज्य सहकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटनेने पाठिंबा देत, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
दुसरीकडे अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) व आशा वर्कर्स यांच्या 'सिटू' या संघटनेमार्फत प्रलंबित पदोन्नती, थकीत बिले, सेवानिवृत्ती मानधन यासह विविध मागण्यांसाठी देशव्यापी संप पुकारण्यात आला होता. यात बुलडाणा शहरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यासोबतच नागरिकत्व सुधारणा कायद्यासंदर्भात बहुजन क्रांती मोर्चा व राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा यांच्यामार्फत शहरातून आक्रोश रॅली काढण्यात आली. या रॅलीला गोर सेनेसह विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला. शेकडो महिला आणि पुरुष या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
हेही वाचा : सख्ख्या भाचीवर बलात्कार करणाऱ्या नराधम मामाला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा!