बुलडाणा-दुचाकी चोरून विकणाऱ्या टोळीचा लोणार पोलिसांनी शुक्रवारी पर्दापाश केला आहे. या कारवाईमध्ये 5 आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 8 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. चोरट्यांमध्ये परजिल्ह्यातील आरोपींचा देखील समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
परजिल्ह्यातून चोरीच्या दुचाकी आणून लोणारमध्ये विकल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तालुक्यातील सावरगावमुढे येथील ऋषीकेश भिकाराव नागरे वय 19 वर्ष, करण अनिल तारे वय 20 वर्ष रा. किन्ही, धिरज संतोष अवसरमोल वय 20 वर्षे रा. रामनगर लोणार यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीची तपासणी केली. त्यामध्ये या दुचाकीची नंबर प्लेट बदलण्यात आल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून 8 दुचाकी जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच या टोळीचा मुख्यसुत्रधार असलेला परभणी जिल्ह्यातील प्रताप बाजीराव इंगळे याला देखील जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.