बुलडाणा - काश्मीर येथील पुलवामामध्ये गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात राज्यातील २ जवानांना वीरमरण आले. संजय राजपूत आणि नितीन राठोड, असे त्यांची नावे असून दोघेही बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यामुळे बुलडाण्यासह महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. आज रात्री ७.३० वाजण्याच्या दरम्यान श्रीनगरवरून त्यांचे पार्थिव नागपूर विमानतळावर येणार आहे. त्यानंतर त्यांचे पार्थिव दोघांच्याही मुळगावी नेण्यात येईल.
पुलवामा हल्ल्यात महाराष्ट्राचे २ जवान धारातिर्थी; मराठी वीरांचे पार्थिव उद्या नागपुरात - पुलवामा हल्ला
आज रात्री ७.३० वाजण्याच्या दरम्यान श्रीनगरवरून त्यांचे पार्थिव नागपूर विमानतळावर येणार आहे. त्यानंतर त्यांचे पार्थिव दोघांच्याही मुळगावी नेण्यात येईल.
मलकापूरच्या संजय राजपूत यांना वीरमरण, घराबाहेर स्थानिकांची गर्दी -
संजय राजपूत (वय -४९), असे वीरमरण आलेल्या जवानाचे नाव आहे. ते बुलडाण्याच्या मलकापूर येथील रहिवासी आहेत. संजय राजपूत यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून त्यांच्या कुटुंबियांना सांत्वना देण्यासाठी स्थानिकांनी घराबाहेर गर्दी केली आहे.
सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर गुरुवारी दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामध्ये तब्बल ४० जवानांना वीरमरण आले होते. त्या जवानांमध्ये संजय राजपूत यांचाही समावेश होता. संजय हे सीआरपीएफ बटालियन ११५ मध्ये कार्यरत होते. त्यांना ११ फेब्रुवारीला काश्मीरकडे पाठवण्यात आले होते. त्यांच्या मागे २ भाऊ, १ बहिण, पत्नी आणि २ मुले आहेत. जय (वय -१२) आणि शुभम अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत. त्यांचे कुटुंब( पत्नी आणि २ मुले )हे काही दिवसांआधीच नागपूर ग्रुप सेंटर ऑफ सीआरपीएफच्या रहिवासी क्षेत्रात राहायला गेले होते.
संजय यांचा जन्म ८ मे १९७३ ला झाला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण मलकापूरच्या नूतन विद्यालयामध्ये झाले. शाळेमध्येच असताना ते एनसीसीचे कॅडेट होते. तेव्हापासूनच देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढण्याची त्यांची इच्छा होती. त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ होता, असे त्यांचे मित्र सांगतात.
नितीन राठोड यांना वीरमरण, चोरपांग्रा गावावर शोककळा -
नितीन शिवाजी राठोड (वय -३६), असे पुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानाचे नाव आहे. ते बुलडाण्यातील चोरपांग्रा येथील रहिवासी होते. शनिवारी सकाळी त्यांच्या मुळघरी चोरपाग्रा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
कुटुंबाची परिस्थिती नसताना जिद्द व चिकाटीच्या जोरावर नितीन सैन्यात भर्ती झाला होता. त्यामुळे नितीनचा आमच्या संपूर्ण कुटुंबाला अभिमान होता, असे नितीन यांचे भाऊ प्रविण राठोड सांगतात. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ, बहिण तसेच एक मुलगा आणि एक मुलगी असे कुटुंब आहे.