बुलडाणा - कोरोना विषाणूच्या थैमानाने जग मेटाकुटीस आले आहे. मात्र, बुलडाणा जिल्ह्यातून कोरोनाच्या या हल्लकल्लोळात काही सुखद वृत्तही येत आहे. आज मंगळवारी 28 एप्रिल रोजी आणखी दोन रूग्णांनी कोरोनावर मात दिली आहे. कोरोनातून बरे झाल्याने मलकापूर व बुलडाणा येथील रूग्णांना आज कोविड 19 रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात एकूण 24 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी एक मृत आहे.
बुलडाणा 9, चिखली 3, दे.राजा 2, सिं. राजा 1, मलकापूर 4, शेगांव 3 व चितोडा ता. खामगांव येथे 2 रूग्ण होते. अशाप्रकारे जिल्ह्यात 24 रूग्ण आहेत. त्यापैकी आतापर्यंत 15 रूग्णांना बरे झाल्याने रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये आज दोन रूग्णांची भर पडली असून ही संख्या 17 झाली आहे. सध्या कोविड 19 रूग्णालयात 6 रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे.
प्रशासनाने कंटेन्टमेंट झोन, लॉकडाऊन पूर्णपणे बंदी, विहीत कालावधीत जीवनावश्यक वस्तुंचे दुकान उघडण्यास परवानगी आदी उपाययोजनांमुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मर्यादीत आहे. आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून राबविलेल्या उपाययोजनांमुळे आज दोन रूग्णांचा दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यांना आनंदाने जिल्हा आरोग्य प्रशासनाने निरोप दिला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्यासह सर्व डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवून बरे झालेल्या रूग्णाचे स्वागत केले.