बुलडाणा - राज्यासह बुलडाण्यात विधानसभेचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. राज्यात भाजप-शिवसेना युतीचा तिढा सुटला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षासोबत वंचित बहुजन आघाडी जाणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. यामध्ये अशीच परिस्थिती कायम राहिल्यास परिणामी जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघामध्ये युती, आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी अशी चुरशीची तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. तर यामध्ये वंचित बहुजन आघाडीची भूमिका परिणामकारक ठरणार आहे. तसेच यावेळीची निवडणूक स्थानिक नेत्यांसाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे. पाहुयात याच संदर्भातला हा खास ईटीव्ही भारतचा हा रिपोर्ट....
खामगाव विधानसभा मतदारसंघात सध्या महाराष्ट्र राज्याचे दिवंगत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे चिरंजीव आकाश फुंडकर हे आमदार आहेत. त्यांनी २०१४ मध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून आमदार असलेले दिलीप सानंदा यांचा ७०६१ मतांनी पराभव केला होता. त्यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवली होती. मात्र, राष्ट्रवादी आणि शिवसेना उमेदवाराला अल्प मते मिळाली. त्यामुळे या मतदारसंघात खऱ्या अर्थाने भाजप, काँग्रेस आणि भारिप बहुजन महासंघ अशीच तिहेरी लढत पाहायला मिळाली होती. तर यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजप-शिवसेना या पक्षांची युती आहे. तर वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत गेल्यास गेल्या निवडणुकीचे चित्र बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष तथा गेल्या निवडणुकीत उमेदवार असलेल्या अशोक सोनोने यांना सन्मानजनक मते पाहून यावेळी वंचित बहुजन आघाडी देखील मतदारसंघावर दावा करू शकते.
मागील पंधरा वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेला हा बालेकिल्ला गेल्या निवडणुकीमध्ये भाजपाने आपल्या ताब्यात घेतले आहेत. त्यामुळे माजी आमदार दिलीप सानंदा यांच्यासह यांच्या तालमीत घडलेले तर काहींनी नगरपरिषद तसेच जिल्हा परिषद निवडणूक देखील लढवली नसलेले उमेदवारदेखील आज काँग्रेस पक्षाकडे आपली उमेदवारी मागत असल्याने माजी आमदार दिलीप सानंदा यांचे मतदार संघासह काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे यांच्यावरील प्रभुत्व कमी झाले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काँग्रेसकडून धनंजय देशमुख आणि तेजेंद्र सिंह चव्हाण यांनीदेखील आपल्या उमेदवारीची मागणी पक्षाकडे केली आहे. मात्र, दिलीप सानंदा यांनी एकनिष्ठेने पक्षासाठी केलेले कार्य आणि मतदार संघातील जनसंपर्क याची दखल घेत पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही तर भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून विद्यमान आमदार आकाश फुंडकर हे दावेदार असल्यामुळे तेच निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित आहे.
तर वंचित बहुजन आघाडीकडून गणेश चौकसे, अशोक सोनोने, पंजाबराव देशमुख यांनी आपल्या पक्षाकडे उमेदवारीसाठी दावा केला आहे. यात अशोक सोनोने यांच्याकडे पक्षाने प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याने या मतदारसंघात सामाजिक समीकरण जुळविण्यासाठी नवीन चेहरा मिळण्याची संकेतही वर्तवल्या जात आहेत. तर वंचित बहुजन आघाडी काँग्रेस सोबत गेल्यास युती आणि आघाडी अशी सरळ टक्कर मतदारसंघात पाहायला मिळणार आहे. यामध्ये दिवंगत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव आमदार आकाश फुंडकर यांच्याप्रती मतदारसंघात भावनिक लाट असल्याचेही जाणकारांचे मत आहे.
खामगाव शहरामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी दिवंगत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे स्वप्न असलेले टेक्स्टाईल पार्क करण्याचा मुद्दा अजून अपूर्ण आहे. तर आ.आकाश फुंडकर यांच्या प्रचाराकरिता 2014 मध्ये खांमगावात पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. त्यावेळी खामगाव जिल्हा झाला का ? खामगाव-जालना रेल्वे महामार्ग झाले का ? जिगाव धरण प्रकल्पाचे काय झाले ? काँग्रेसचे मुख्यमंत्री आले-गेले असे भाष्य करण्यात आले होते. या निवडणुकीत देखील हा मुद्दा अग्रस्थानी राहणार आहे. आणि भाजपा सरकारने देशासह राज्यात केलेल्या विकास कामे आणि जम्मू-काश्मीर मधील कलम 370 आणि 35 ए काढल्याचा मोठ्ठा मुद्दा असून या जोरावर पुन्हा एकदा भाजपा उमेदवार जनतेच्या समोर मते मागण्यासाठी जाणार आहे. यामध्ये विजयाचा दावा देखील केला जात आहे. तर काँग्रेसकडून भाजपा सरकारने जनहिताच्या विरोधात जीएसटी नोट बंदीसारखे निर्णय घेऊन जनतेची एकप्रकारे दिशाभूल केली आहे. याबाबत रोष दाखवत मतदारसंघातील मतदार पुन्हा एकदा मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवणार असल्याचे दावा काँग्रेसकडून केला जात आहे.