बुलडाणा -जिल्ह्यातील मलकापूर, जलंब, अंढेरा आणि हिवरखेड या 4 पोलीस ठाण्यांच्या ठाणेदारांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याने जिल्हा पोलीस प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. कैलास नागरे, पांडुरंग इंगळे, नरेंद्र ठाकरे व एकनाथ बावस्कर अशी बदली करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत. यातील तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती पोलीस नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.
या कारणावरून बदली करण्यात आल्याची चर्चा
जलंब पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला लाच स्वीकारताना एसीबीने अटक केले होते. हे प्रकरण जिल्ह्यात चांगलेच गाजले, विशेष म्हणजे तक्रारकरता देखील एक पोलीस कर्मचारीच होता. या प्रकरणातूनच जलंब पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. मलकापूर शहर ठाण्याचा पदभार स्वीकारल्या पासूनच कैलास नागरे चर्चेत राहिले होते. तर अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दती वाळू तस्करांवर करण्यात आलेली कारवाई व एका क्लबवर टाकलेल्या छाप्याची चांगलीच चर्चा रंगली होती. याची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी मलकापूर शहर, जलंब, अंढेरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या ठाणेदार कैलास नागरे, पांडुरंग इंगळे, नरेंद्र ठाकरे व एकनाथ बावस्कर यांची बदील केली आहे.
रिक्त जागेवर यांना देण्यात आली नियुक्ती
दरम्यान जलंबचे ठाणेदार पांडुरंग इंगळे यांच्या जागी खामगाव येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे धीरज बांडे यांना, मलकापूर शहर ठाणेदार कैलास नागरे यांच्या जागी नियंत्रण कक्षातील प्रल्हाद काटकर यांना, अंढेराचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांच्या जागी चिखली ठाण्यातील राजवंत आठवले याना व हिवरखेडचे ठाणेदार एकनाथ बावस्कर यांच्या जागी बुलडाणा ग्रामीणचे ठाणेदार हरिविजय बोबडे यांना नियुक्ती देण्यात आली आहे.