बुलडाणा- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून 6 एप्रिलपासून 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आले आहे. या लॉकडाऊनला वंचित बहुजन आघाडीनंतर बुलडाणा शहरातील व्यापाऱ्यांनीदेखील विरोध दर्शवला आहे. नागरिकांनी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना आज मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील परिसरात घेराव घालण्यात आला. लॉकडाऊनमुळे कोरोना साखळी तुटण्यास मदत होणार नाही. नागरीक रस्त्यावर फिरतच आहे. त्यामुळे आठवड्यातील 5 दिवस काही तासांकरीता आस्थापने उघडण्याची परवानगी देण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने शासनाकडून सोमवारी 4 एप्रिल रोजी 30 मार्चपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. बुलडाणा जिल्हा दंडाधिकारी एस. रामामुर्ती यांनी काढलेल्या आदेशानुसार, अत्यावश्यक सेवा वगळून सर्व आस्थापने बंद ठेवण्याचे, संचारबंदी व जमावबंदी तसेच प्रत्येक शनिवार व रविवारी कडक लॉकडाऊन केले जाईल. मात्र, या लॉकडाऊनला व्यापारी संघटनांनी विरोध केला आहे. लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे. आस्थापने बंद असतांनाही बँकेचे व्याज सुरू असून वेळेवर हप्ता भरावाच लागतो. त्यामुळे व्यापारी व व्यापाऱ्यांकडे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे किमान आठवड्यातील 5 दिवस काही तासांकरीता आस्थापने उघडी ठेवण्याची मागणी व्यापारी वर्गाकडून पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
यांच्याकडे करण्यात आली. यावेळी लॉकडाऊनचा निर्णय हा शासन स्तरावरील असून यासंदर्भात मी मंत्रीमंडळाच्या बैठकीत व्यापाऱ्यांचा मुद्दा उपस्थित करणार असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.