बुलडाणा -दोनशे रुपये जास्तीचा भाव देवून खामगाव तालुक्यातील ज्ञानगंगापूर येथील कापूस उत्पादकांना फसवणाऱ्या व्यापाऱ्याचा डाव शेतकऱ्यांनी मोडून काढला. त्यानंतर शेतकऱ्यांनी पोलिसात धाव घेतली. मात्र, आरोपींवर गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे दोषी व्यापाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगापूर गावातील शेतकरी कापूस घाणेगाव येथील गोपाल शित्रे व पिंपळगाव राजा येथील शब्बीर डॉन या दलालामार्फत कापूस विक्री करत होते, तर बाळापूर येथील व्यापारी यांनी शेतकऱ्यांचा कापूस मोजमाप करताना 1 क्विंटल मागे 40 किलो कापूस जास्त घेत असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात येताच शेतकऱ्यांनी गोधळ घातला. त्यामुळे मोजमाप करणारे तेथून पसार झाले आणि दलाल गोपाल शित्रे यास पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. शेतकऱ्यांची याठिकाणी फसवणूक होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात दाखल केली. मात्र, अद्यापही गुन्हा नोंदवण्यात आला नव्हता.