महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांच्या जिल्ह्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार; तिघांना अटक - बुलडाणा रेमडेसिवीर इंजेक्शन काळाबाजार आरोपी अटक

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत काळाबाजार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बुलडाण्यामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आले.

Buldana Remdesivir injection black marketing
बुलडाणा रेमडेसिवीर इंजेक्शन काळाबाजार

By

Published : May 6, 2021, 10:03 AM IST

बुलडाणा - रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजर केल्याप्रकरणी नांदुरा येथील गैबीनगर परिसरात धाड टाकून एलसीबीने तीन आरोपींना अटक केली. कोरोना काळात गैरफायदा घेऊन रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची माहिती बुलडाणा एलसीबीला मिळाली होती. या माहितीच्या आधारे बुलडाणा एलसीबीच्या पथकाने बुधवारी छापा टाकला होता. आरोपींकडून 10 रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत. या इंजेक्शनची प्रत्येकी 15 हजार रुपयेप्रमाणे काळ्या बाजारात विक्री केली जात होती. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या जिल्ह्यातच रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याचे या कारवाईतून समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांच्या जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार

आरोपी वाढण्याची शक्यता -

बुधवारी सायंकाळी गैबीनगरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली. एलसीबीने आझादखा इनूसखा (वय 31, रा. गैबी नगर नांदुरा), अलबग हुसेन उर्फ नुरआलम अबुबकर अंन्सारी (वय 30 रा. खुतरा जि. हजारीबाग, झारखंड), शे. इरफान शे. अजमत (वय 20, रा. गैबी नगर, नांदुरा) या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 10 रेमडेसिवीर इंजेक्शन व 2 मोबाईल, असा एकूण 1 लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी त्यांना नांदुरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेले रेमडेसिवीर इंजेक्शन कोठून व कुणाकडून आणले गेले याबाबत तपास सुरू असून या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

दरम्यान, या कारवाईमुळे काळा बाजार करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक बजरंग बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गिते यांच्या आदेशावरुन करण्यात आली. अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी यापूर्वीच रेमडेसीवीरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कार्रवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details