बुलडाणा - मुंबईला खरेदीसाठी गेलेल्या तीन युवकांजवळील पैसे संपल्याने त्यांनी पैशांसाठी एका विक्रीकर अधिकाऱ्याला लक्ष्य केले. त्याच्यावर चाकूने वार करत गळा चिरून मोबाइल व 8 हजार रुपये घेऊन हे तिघे पसार झाले. अखेर त्यांना बुलडाणा शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन नवी मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
मुंबईत विक्रीकर अधिकाऱ्याला लुटणाऱ्या तीन आरोपींना बुलडाण्यातून अटक..भर रस्त्यात चिरला गळा! बुलडाण्यातील अमित सुनील बेंडवाल,आबिद खान अयुब खान उर्फ कालू ,अदनान कुरेशी वहीद कुरेशी उर्फ बब्या हे तिघे शॉपिंग करण्यासाठी मुंबईला गेले होते. पैसे नसल्याने त्यांनी 22 ऑक्टोबर रोजी रात्री 7:30 वाजेच्या सुमारास नवी मुंबईतील सीबीडी सर्कल जॉगिंग ट्रॅक जवळ पायी जाणाऱ्या विक्रीकर अधिकाऱ्यावर हल्ला केला. महेश मधुकर बिनवडे यांच्यावर अचानकपणे चाकूने वार करून त्यांना जखमी केले. यानंतर त्यांच्या जवळील स्मार्ट फोन व 8 हजार रुपये घेऊन हे चोरटे फरार झाले. या हल्ल्यात महेश बिनवडे यांचा गळा चिरला. गंभीर जखमी झाल्याने सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात भादंसं कलम 394 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. जखमी बिनवडे यांच्या मोबाइलचे लोकेशन ट्रॅक केल्यानंतर ते मुंबईत सापडले. संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन विचारपूस केल्यावर बुलडाणा येथील आरोपींनी गुन्हा केल्याचे समोर आले. याची माहिती बुलडाणा शहर पोलीस निरीक्षक प्रदीप साळुंखे यांना देण्यात आली होती.
शहर डीबी पथकाने बुलडाण्यातील आरोपी अमित सुनील बेंडवाल, आबिद खान व अदनान कुरेशी या तिघांना ताब्यात घेतले. गुरुवारी 29 ऑक्टोबर रोजी बेलापूर पोलीस बुलडाणा शहरात दाखल झाले. या तिन्ही आरोपींना त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या दरोड्यात मुंबईतील अन्य 2 आरोपींचा समावेश असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप साळुंखे यांनी दिली असून आरोपी अमित बेंडवाल याच्यावर अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचे त्यांनी सांगितले.