बुलडाणा - गेल्या 10 महिन्यांपूर्वी बुलडाण्यातील गुटखा चोरणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात यश मिळाले आहे. या टोळीने शासकीय प्रशासकीय इमारतीमध्ये असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयामधील गोडाऊनमधील गुटखा चोरी केला होता.
बुलडाणा गुटखा चोरणारी टोळी जेरबंद जिल्ह्यात चर्चांना उधाण
जिल्ह्यातील विविध कारवायांमध्ये जप्त करुन प्रतिबंध केलेल्या गोडाऊनमधील गुटखा, चोरट्यांनी चोरला होता. अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी याची दखल घेत चोरट्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले होते. मात्र तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांच्या पथकाला यात यश आले नव्हते. यानंतर नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी पदभार स्वीकारताच या प्रकरणाला गांभीर्याने घेण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुख पदावर नव्याने पदभार स्वीकारणारे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांना आपल्या पथकाद्वारे या चोरट्यांच्या टोळीला पकडून जेरबंद केले. या प्रकरणामुळे जे तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक भुजबळ यांना करता आले नाही, ते नव्याने रुजू झालेल्या जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी करून दाखवले, अशा चर्चेला जिल्ह्यात उधाण आले आहे.
डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे आदेश
बुलडाणा सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील गोडाऊनमधून डिसेंबर 2019 रोजी 3 लाख रुपयांचा गुटखा चोरीला गेल्याची घटना घडली होती. याबाबत 11 डिसेंबर 2019 रोजी वरिष्ठांनी याबाबत तक्रार दिल्याने गुन्हा दाखल केला होता. असाच प्रकार पुन्हा 10 फेब्रुवारीला घडला होता. मात्र चोरी झाली नसून चोरीचा प्रयत्न झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. याची दखल घेत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन कार्यालयाची, जप्त केलेल्या गुटखा गोदामाची पाहणी करून संपूर्ण विभागाची झाडाझडती घेतली. या मोहिमेंतर्गत 22 लाख रूपयांच्या जप्त असलेल्या गुटख्याच्या गोडाऊनला पोलिसांकडून संपूर्ण कारवाई होईपर्यंत सील करून सहाय्यक आयुक्त कार्यालयात पोलिसांची तैनाती ठेवण्याचे आदेश दिले होते. चोरट्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेशही पोलीस प्रशासनाला दिले होते. या प्रकरणास जबाबदार धरत अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अनिल राठोड, अन्नसुरक्षा अधिकारी नवलकर यांना निलंबित केले होते.
किती लाख रुपयांचा गुटखा चोरी गेला?
नवीन पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांनी या प्रकरणाकडे लक्ष केंद्रित केले. पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला आणि गुन्ह्यातील मुख्य आरोपी मोहम्मद तौफिक मोहम्मद रफिक याला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केल्यानंतर त्याने सैय्यद समीर सय्यद जहिर, अक्षय राजु अवसरमोल, शेख बिलाल शेख रब्बानी, विशाल दांडगे, काला आसीफ यांच्यासह चोरी केल्याचे कबुल केले. यात 2 लाख 34 हजार रुपयांचा गुटखा, 3 लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन, 50 हजारांची दुचाकी असा एकूण 5 लाख 84 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हेही वाचा -मुंबई-पुणे एक्सप्रेस वे'वर बसचा अपघात; १ ठार तर १६ जखमी