बुलडाणा - मागील काळात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई आणि ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे अशी मागणी करणारे विरोधी पक्षामधले आमदार-खासदार सरकारमध्ये मंत्री झाले. परंतु त्यांना या गोष्टीचा विसर पडला आहे. आणि म्हणून जाणूनबुजून आमदार खासदार आणि मंत्री आमच्या शेतकऱ्यांची दिवाळी कडू करणार असतील. शेतकऱ्यांची दिवाळीच्या तोंडावर चेष्टा करणार असतील. तर राज्यामधील एकाही मंत्र्यांची आम्ही दिवाळी साजरी होऊ देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा पुजाताई मोरे यांनी दिला. त्या बुलडाण्याच्या जळगाव जामोद येथे युवा आघाडीचे विदर्भ प्रमुख प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा संताप मोर्च्यात सहभागी झाल्या होत्या.
तर मंत्र्यांची दिवाळी साजरी होऊ देणार नाही - पूजा मोरे
बुलडाण्यात ओला दुष्काळ जाहीर करा. हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत तसेच चालू वर्षांचा 100 टक्के पीकविमा मंजूर करा. शेतकऱ्यांचे चालू वर्षासह संपूर्ण कर्ज माफ करा या मागण्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बुलडाण्यात मोर्चा काढला.
गेल्या दोन महिन्यापासून नैसर्गिक आपत्तीने शेतकरी संपूर्ण उध्वस्त झाला आहे. मात्र, आता शेतकरी हतबल झाला आहे. खरी गरज आहे ती आर्थिक मदतीची. सरकार फक्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करीत आहे. मात्र, आर्थिक मदतीपासून शेतकरी वंचित ठेवत आहे. याची आठवण देण्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा विदर्भ प्रमुख प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वाने जळगाव जामोद येथे मोर्चा काढला.
या करण्यात आल्या मागण्या -
बुलडाण्यात ओला दुष्काळ जाहीर करा. हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत तसेच चालू वर्षांचा 100 टक्के पीकविमा मंजूर करा. शेतकऱ्यांचे चालू वर्षासह संपूर्ण कर्ज माफ करा या मागण्या घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोर्चा काढला. आणि उपविभागीय अधिकाऱ्यास निवेदन दिले. येत्या काळात शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना उग्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला.
आयोजकांवर गुन्हे दाखल
या मोर्च्याला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जारीं केलेल्या ब्रेक द चैन, कोविड विषाणूच्या संसर्गाच्या आदेशाच्या तसेच जिल्ह्यात 37(1)(3) कलम सुरू असतांना शिवाय कलम 159 ची नोटीस दिली असतांना आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजकांवर जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा -माझ्या परिवाराची संपत्ती कुठे कुठे ते शोधा; कुणाच्या बापाला घाबरत नाही - मंत्री नवाब मलिकांचे आवाहन