बुलडाणा - अन्न व औषध प्रशासन विभाग बुलडाणा यांच्या कार्यालयातून जप्त केलेल्या गुटख्याची चोरी झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. डिसेंबर महिन्यातही कार्यालयातील गोडाऊनमधून 3 लाखांचा गुटखा चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला. मात्र, अद्याप तपासात काहीही निष्पन्न झाले नाही. त्यात आता पुन्हा एकदा कार्यालयातून गुटखा चोरीला गेल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांच्या जिल्ह्यात जप्त केलेल्या गुटख्याचीच झाली चोरी - Seized Gutkha
राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या जिल्ह्यात जप्त करण्यात आलेल्या गुटख्याचीच चोरी झाल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मंत्री डॉ. शिंगणे यांनी दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
हेही वाचा...कोरेगाव भीमा प्रकरण: ‘एनआयए’कडे तपास देण्यावरून महाविकासआघाडीत ठिणगी
सोमवारी 10 फेब्रुवारीला या कार्यालयातून गुटखा चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, गुटखा चोरीला गेला नसून फक्त चोरीचा प्रयत्न झाल्याचे अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रकाराची अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी गंभीर दखल घेतली आहे. गुरुवार 13 फेब्रुवारी रोजी आपण अन्न व औषध प्रशासन कार्यालयात भेट देणार आहेत. तसेच याप्रकरणी पोलीस कारवाई करण्यात येणार आहे. यातील दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणार असल्याचा इशाराही हिंगणे यांनी दिला.