बुलडाणा - चाकूचा धाक दाखवून एकास 18 हजार 700 रुपये लुटल्याचा प्रकार मंगळवारी (16 फेब्रुवारी)ला बुलडाण्यात घडला. आरोपींना या घटनेचा एक व्हिडिओ देखील तयार केला होता. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी तिघांना जेरबंद केले. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांच्या ताब्यात असताना देखील आरोपींनी बुधवारी सोशल मीडियावर खुनाच्या गुन्ह्याचे 'कलम ३०२' असे स्टेटसही अपलोड केले. त्यावरून आरोपींनी एक प्रकारे तक्रारकर्त्याला धमकी दिल्याचा प्रकार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. पोलिसांच्या ताब्यात असताना आरोपीने मोबाईल वापरून अशा प्रकारे अप्रत्यक्षपणे धमकी दिल्याने पोलिसांच्याही कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण झाला आहे.
तरुणाला मारहाण करून लूट; जेरबंद आरोपींनी स्टेटस ठेवून दिली खुनाची धमकी? - बुलडाणा तरुणाला लुटले
धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांच्या ताब्यात असताना देखील आरोपींनी बुधवारी सोशल मीडियावर खुनाच्या गुन्ह्याचे 'कलम ३०२' असे स्टेटसही अपलोड केले. त्यावरून आरोपींनी एक प्रकारे तक्रारकर्त्याला धमकी दिल्याचा प्रकार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
५० रुपयांसाठी मारहाण-
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, जोहर नगर येथील रहवासी शेख आकीब शेख आरिफ (24) हा मंगळवारी चिखली रोडवरील एका खासगी रुग्णालयात रात्रपाळीस कामाला जात होता. त्यावेळी अमित सुनील बेंडवाल, प्रतीक बोर्डे आणि केतन तरवाडे या तिघांनी त्याची दुचाकी अडवून 50 रुपयांची मागणी केली. मात्र, तक्रारदाराने पैसे नसल्याचे सांगताच चाकूचा धाक दाखवून त्याच्या खिशातील 18 हजार 700 रुपये काढून घेतले. तसेच अमित बेंडवाल याने तक्रारदाराच्या छातीवर चाकूने वार केला. तसेच इतरांनी मारहाण केली. या सर्व घटनेचा त्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. एवढ्यावरच न थांबता या प्रकरणी पोलिसात तक्रार दिल्यास अंगावर अॅसिड टाकून जीवे मारण्याचीही धमकी आरोपींनी दिली. त्यानंतर तक्रारदाराने या तिघा आरोपीविरोधात तक्रार दाखल केली असता, पोलिसांनी त्या तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
इन्स्टाग्रामवर अपलोड केले धमकीचे स्टेटस-
आरोपी अमित सुनील बेंडवाल, प्रतीक बोर्डे आणि केतन तरवाडे या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर तिघा आरोपींच्या हातात बेड्या असल्याचे फोटो काढत आम्हाला तर आता पोलीस सुरक्षा मिळाली आहे. 'अब तो सिधा 302'अशा आशयाचे एक स्टेटस तयार करून बुधवारी रात्री अमित बेंडवाल इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर ते अपलोड केले. या माध्यमातून त्यांनी तक्रारदारास अप्रत्यक्षपणे धमकी दिल्याचा प्रकार केला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कारण पोलीस कस्टडीमध्ये असताना त्यांनी मोबाईल कसा वापरला यावरून बुलडाणा शहर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण करण्यात येत आहे.