बुलडाणा- फिरत्या चाकावर ओल्या मातीला हाताने आकार देऊन कुंभार नानाविध भांडी तयार करतो. त्याच हाताने मातीतून देवाच्या सर्वांगसुंदर मूर्ती घडविल्या जातात. या पारंपरिक व्यवसायावरच शेकडो कुटुंबाच्या घरातील दोनवेळची चूल पेटते. पण, कोरोनामुळे या व्यवसायाला मोठी झळ बसली आहे. मार्च महिन्यापासून सुरू झालेली होरपळ संपलेली नाही. यामुळे यंदाची दिवाळी अंधारतच होण्याची भीती समाजाकडून वर्तवली जात आहे. सरकारने आर्थिक मदत द्यावी, ही मागणी जोर धरत आहे.
कुंभार समाजाचा पारंपारिक व्यवसाय हा मातीच्या वस्तू बनविणे आहे. मातीपासून भांडे, मूर्ती तयार करून विक्री करणे. कुंभार समाज दिवसरात्र घाम गाळून दरवर्षी हंगामाच्या दिवसात भांडे, सुरई, दिवा-पणती, कलश, मटक्यासारख्ये वस्तू मातीपासून तयार करतात. त्यानंतर त्याची विक्री करुन आपला उदरनिर्वाह करतात. मागील दिवसात अनेक सण येऊन गेले व आता दिवाळी येणार असून कुंभार समाज आपल्या कामात गुंतलेला आहे. कुंभार समाज आता लक्ष्मी पूजनासाठी मूर्ती तयार करण्याच्या कामात व्यस्त आहे. मात्र, कोरोनाच्या काळात मुर्त्यांची विक्री होणार की नाही, याची चिंता त्यांना सतावत आहे. उन्हाळ्यात लागणारे रांजन माठ, मडके व इतर उपयोगी वस्तू तयार करून त्या वस्तूची विक्री करण्याचा हंगाम असून दोन पैसे कमावून आपला संसार कसाबसा चालवतात. पण, मागील आठ महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली टाळेबंदी त्यानंतर नागरिकांमधील कोरोनाची भीती यामुळे कुंभार समाज आर्थिक संकटात सापडला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.