बुलडाणा- सध्या मुंबईतील सचिन वाझे प्रकरणामुळे राज्यातील पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तसेच बुलडाण्याच्या एका प्रकरणात प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. भरधाव रुग्णवाहीचा टायर फुटल्याने अनियंत्रित रुग्णवाहिकेने पाच जणांना चिरडल्याची घटना 17 मार्चच्या मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडली होती. यात दोघांचा मृत्यू झाला होता तर तीन जण जखमी झाले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली होती. मात्र, टायर फुटलाच नाही, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. यामुळे बुलडणा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
... तर लोकांनी कोणावर विश्वास ठेवायचा
एका प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार, अपघातात त्या रुग्णवाहिकेचा टायर फुटलेच नव्हते. आम्हाला मोठ्या अपघाताचा आवाज येताच काही क्षणात महावितरण कार्यालयातून घटनास्थळी पोहोचल्यानंतर तोपर्यंत रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 5 जणांना चिरडून रुग्णवाहिका पसार झाली होती. जर टायर फुटला असता तर रुग्णवाहिका घटनास्थळीच थांबली असती इतकी दूर गेली नसती. आम्ही त्या ठिकाणी खूप वेळ होतो.पोलीस चुकीची माहिती पसरवत असेल तर लोकांनी विश्वास कोणावर ठेवायचा, असा प्रश्न प्रत्यक्षदर्शी ईश्वरसिंग चंदेल यांनी उपस्थित केला आहे. ते बुलडाणा महावितरण कंपनीच्या कार्यालयात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. यामुळे टायर फुटल्याने अपघात झाल्याचा पोलीस कांगावा का करत आहे, असा प्रश्नही यावेळी उपस्थित होत आहे. रुग्णवाहिकेने चिरडल्यामुळे अनिल गंगाराम पडळकर (29 वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला तर माया पडळकर यांचा अकोला येथे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
प्रत्यक्षदर्शी ईश्वरसिंग चंदेल यांचे हे आहे म्हणणे
त्या रुग्णवाहिकेने पाच जणांना 17 मार्चला चिरडले होते. त्यावेळीच मी महावितरण कार्यालयामध्ये कर्तव्यावर होतो. आम्ही आवाज ऐकून त्या ठिकाणी गेलो. त्यावेळी त्या ठिकाणाहून रुग्णवाहिका वेगाने गेली. याठिकाणी टायर फुटला असेल तर रुग्णवाहीका इतकी लांब जाऊ शकत नाही. आम्ही खूप वेळ त्या ठिकाणी होतो. त्यांना पोलीसांच्या वाहनात आम्हीच बसवलो. मात्र, पोलिसांकडून टायर फुटल्याची खोटी माहिती पुरवली जात आहे. आम्ही त्या गोष्टीचे साक्षीदार असून पोलिसांना स्वतः फोन करून याठिकाणी माझी साक्ष नोंदवून घेण्यासाठीही सांगितल्याचे ईश्वरसिंग चंदेल यांनी सांगितले.