बुलडाणा- प्लॉटच्या सातबारा उताऱ्यात नाव समाविष्ट करणे आणि सामाईक शेतीचे सातबारातील नावामध्ये दुरुस्ती करून देण्यासाठी तलाठ्याने शेतकऱयाकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ अटक केली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली.
हेही वाचा -'अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील गैरकारभार लपवण्याचे शिक्षण विभागाचे प्रयत्न'
पी.एस.सातपुते (वय 32 रा. श्रीकृपा रेसीडन्सी, शेगाव) असे या लाचखोर तलाठ्याचे नाव असून संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे तो तलाठी म्हणून कार्यरत आहे. तक्रारदार यांना त्यांच्या सातबारा उताऱ्यात नाव समाविष्ट करणे आणि सामाईक शेतीच्या सातबारातील नावामध्ये दुरुस्ती करुन देण्याच्या बदल्यात १४ हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग बुलडाणा यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीवरून १३ जानेवारी आणि २७.जानेवारीला पडताळणी कार्यवाही आयोजित करण्यात आली असता, लोकसेवक तलाठी सातपुते यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांना प्लॉटचे ऑनलाईन सातबारामध्ये नाव समाविष्ठ करण्यासाठी तसेच सामाईक शेतीचे सातबारातील नावामध्ये दुरुस्ती करुन देण्यासाठी तडजोडीअंती १० हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मंगळवारी सापळा कार्यवाही आयोजित करण्यात आली असता, तलाठी सातपुते यांनी तक्रारदार यांच्याकडून लाचेची १० रुपये स्वत स्वीकारले. यावेळी दबा धरून बसलेल्या लाच लुचपत विभागाच्या पथकाने त्यांना ताब्यात घेऊन लाचेची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. पदाचा गैरवापर करून स्वतःसाठी पैशाच्या स्वरुपातील आर्थिक लाभ मिळवण्यासाठी लोकसेवक पदाला न शोभणारे गैरवर्तन केले.त्याच्याविरोधात कलम 7 लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 (संशोधन-2018) प्रमाणे तांगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अँटी करप्शन ब्यूरोचे पोलीस उपअधीक्षक शैलेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी.प्रविण खंडारे, पोलीस निरीक्षक व सापळा पथकातील स्टाफ पोलीस प्रवीण बैरागी, पोलीस सुनिल राऊत, पोलीस विजय मेहेत्रे, चालक पो. कॉ. शेख अर्शीद यांनी पार पाडली.