बुलडाणा -राज्यातील सर्वात मोठी महापंगत म्हणून ओळख असलेल्या स्वामी विवेकानंद जन्मोत्सवाची महापंगत या वर्षी कोरोनाचे संकट लक्षात घेता मर्यादित उपस्थितीत पार पडणार आहे.हा निर्णय विवेकानंद आश्रम प्रशासनाने घेतला आहे. हिवरा येथील संत शुकदास महाराज यांच्या आश्रमात ही महापंगत होते.
हेही वाचा -बुलडाणा; दुरुस्तीसाठी बोथा मार्ग एक महिन्याकरिता बंद
2, 3 व 4 फेब्रुवारी या तीन दिवशी विवेकानंद जन्मोत्सव मर्यादित नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न होणार असून यात महापंगत, यात्रा, मिरवणूक, भजनी, दिंड्या आदी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी नामवंत प्रबोधनकारांना, कलावंतांना निमंत्रित केले असून, त्यांचे कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने प्रसारित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे, कार्यक्रमासाठी व उत्सवासाठी भाविकांनी गर्दी करू नये. घरी राहूनच कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आश्रमच्या कार्यकारी मंडळाने केले आहे.
ऑनलाइन कार्यक्रमात श्रीपाल सबनीस, उत्तम कांबळे, भास्कर पेरे पाटील, चारुदत्त आफळे, पंजाब डख, न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील, हरीचैतन्य स्वामी, प्रकाश महाराज जवंजाळ, गजानन दादा शास्त्री, उद्धवराव गाडेकर, संजय महाराज पाचपोर, कृष्णचैतन्यपुरी, संदीपान महाराज यांच्यासह अनेक नामवंत ज्ञान यज्ञात सहभागी होणार आहेत. प्रशासनाच्या आदेशांचे पालन करताना भाविकांनी सहकार्य करण्याचे व आश्रमात गर्दी न करण्याची कळकळीची विनंती संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.
हेही वाचा -बुलडाण्यातील जामोदमध्ये गोठ्याला भीषण आग, 2 वासरांचा मृत्यू