महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाढीव वीजबिल सवलतीबाबत निर्णय घ्या, अन्यथा...स्वाभिमानीचा इशारा

लॉकडाऊन काळातील वाढीव वीजबिलाच्या वसुलीच्या पार्श्वभूमीवर वीज कनेक्शन कापण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, असे करू देणार नसल्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली आहे.

Increased electricity bill discount
वाढीव वीजबिल सवलत

By

Published : Jan 20, 2021, 4:45 PM IST

बुलडाणा - लॉकडाऊनच्या काळातील वाढीव बिलाच्या वसुलीच्या पार्श्वभूमीवर वीज कनेक्शन कापण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटना वीज विभागाला असे करू देणार नसून वेळप्रसंगी कनेक्शन कापण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्याला ठोकून काढेल. त्यांचे कपडे फाडू व आठवड्याभरात निर्णय न घेतल्यास उर्जामत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला.

माहिती देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर

ऊर्जा खात्याने घुमजाव केल्याचा आरोप -

वीज मीटर रीडिंग न घेता अंदाजे काढण्यात आलेल्या वाढीव वीजबिलांमुळे हैराण झालेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने एक प्रस्ताव तयार केला होता आणि त्यानंतर ग्राहकांना दिलासा देऊ, अशी घोषना सुद्धा करण्यात आली होती. मात्र, आता ऊर्जा खात्याने घुमजाव केला असून बिलाच्या वसुलीसाठी वीज कनेक्शन कापण्याचा ऊर्जा खात्याने आदेश काढलेला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. एकतर लॉकडाऊनच्या काळातील वीज बिलसंदर्भात ऊर्जा खात्याने वेळो-वेळी आपल्या भूमिका बदललेल्या आहे. ग्राहकांना अंधारात ठेवलेले आहे. अवाच्या-सव्वा बिल सामान्य ग्राहकांना भरणे कठीण आहे, म्हणून राज्य सरकारला आमचे सांगणे आहे. ताबडतोब आठवड्याभरात जे काही वाढीव बिल आले असतील त्यामध्ये सवलत देण्याचा निर्णय सरकारने घेतला पाहिजे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सांगितले.

हेही वाचा -बुलडाणा : आरटीओ दुतोंडे व त्यांच्या शेजारच्या घरात चोरी, 56 हजाराचा मुद्देमाल लंपास

तसेच, जर कोणी वीज कनेक्शन कापण्यासाठी येत असेल तर त्या कर्मचाऱ्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना ठोकून काढेल, त्यांचे कपडे फाडू, परंतु कोणत्याही सामान्य माणसाचा कनेक्शन आम्ही कट करू देणार नाही. ही आमची भूमिका आहे. ऊर्जा मंत्र्यांनाही आमचे ठणकावून सांगणे आहे. आठवड्याभरात वाढीव बिलसंदर्भात सवलतीचा निर्णय जर तुम्ही घेतला नाही, तर तुम्हालाही महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटना फिरू देणार नाही, असा इशारा तुपकर यांनी दिला.

हेही वाचा -बुलडाण्यातील घाटाखालच्या ग्रामपंचायतीवर आमच्याच पक्षाचे उमेदवार विजयी, आजी-माजी आमदाराचा दावा

ABOUT THE AUTHOR

...view details