बुलडाणा- लॉकडाऊन काळातील संपूर्ण वीजबिल माफ करावे, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे. त्या पार्श्वभूमीवर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली बुलडाणा महावितरणच्या मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारला कुलूप ठोकण्यात आले. ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीजबिल देणाऱ्या महावितरणचा यावेळी निषेध करण्यात आला.
लॉकडाऊन काळात सर्वच व्यवसाय बंद होते. नागरिक आपापल्या घरात होते. या काळातील वीजबिल अव्वाच्या सव्वा दराने अगदी १० पट, २० पट आलेले आहे. हे बिल नागरिक भरू शकत नाही म्हणून ते माफ करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एल्गार पुकारला आहे.
या अगोदर देखील वीज वितरणच्या मुख्य कार्यालयातील अधीक्षक अभियंता यांच्या दालनात बैठकमारुन आंदोलन करण्यात आले होते. जो पर्यंत लॉकडाऊन काळातील बिले माफ होत नाही, तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी व चळवळीतील ज्येष्ठ नेते एन.डी. पाटील यांच्या नेतृत्वात आज राज्यभर वीजबिल माफीसाठी आंदोलन करण्यात येत आहे.