बुलडाणा - जुलै महिन्यात शेगाव तालुक्यात आलेल्या पुरामुळे नागरी वस्तीचे व शेतीचे मोठे नुकसान झाले होते. पूरग्रस्तांना राहण्यासाठी घर नाही. सर्व संसार पाण्यात वाहून गेल्याने त्यांना मोठ्या हालअपेष्ठा सहन कराव्या लागत आहेत. परंतु या पूरग्रस्तांचे अद्यापही पुनर्वसन करण्यात आलेले नाही. अशा परिस्थितीत सरकारने या पूरग्रस्तांचे तात्काळ पुनर्वसन करावे, त्यांना नुकसान भरपाईच्या स्वरुपात मदत करावी व घरकुल उपलब्ध करून द्यावे. यासह इतर मागण्यांसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला पूरग्रस्त नागरिक देखील उपस्थित होते.
पूरग्रस्तांच्या पुनर्वसनसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन - राजू शेट्टी
सरकारने पूरग्रस्तांचे पुनर्वसन करावे, त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशा विविध मागण्यांसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुलडाण्यात तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पूरग्रस्त नागरिक देखील सहभागी झाले होते.
![पूरग्रस्तांच्या पुनर्वसनसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन flood rehabilitation](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9347621-233-9347621-1603902267318.jpg)
यावर्षी बुलडाणा जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. यामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि ढगफुटीसारखे प्रकार झाल्याने शेतकऱ्यांसह अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. जुलै महिन्यात शेगाव तालुक्यात ढगफुटीमुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये जवळा परिसरातील नदीला पूर येऊन नदी काठावरी 7 घरे वाहून गेली होती. मात्र अद्यापही त्यांचे पुनर्वसन झालेले नाही. यासाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. सरकारने तातडीने पूरग्रस्तांचे पुनर्वसन करावे, तसेच शेतकऱ्यांना सरसकट जिरायती क्षेत्रासाठी हेक्टरी 25 हजार रुपये तर बागायती क्षेत्रासाठी हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.