बुलडाणा - अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी सडलेले सोयाबीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणून टाकले.
'स्वाभिमानी'चा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; तात्काळ नुकसानभरपाईची मागणी - ravikant tupkar news
पोलिसांनी कितीही आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तरी नुकसान भरपाईसाठीचा लढा अधिक तीव्र करण्यात येईल. तसेच नेत्यांच्या व मंत्र्यांच्या फोटोसेशनचा आम्हाला वीट आला आहे. तसेच शेतकऱ्याची आत्महत्या झाल्यावरच नुकसाभरपाई देणार का, असा सवाल स्वाभिमानीने उपस्थित केला आहे.
सतत पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यात सोयाबीन-कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविमा मिळालेला नाही. शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 25 हजार व जास्तीत जास्त 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, पीकविम्याची भरपाई द्यावा तसेच कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. शेतकऱ्यांनी कोंब फुटलेले व सडलेले सोयाबीन जिल्हाधिकारी कार्यालसमोर आणून तीव्र निषेध नोंदवण्यात आला. यावेळी पोलीस व 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. त्यामुळे रविकांत तुपकरांसह 200 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.