बुलडाणा - शेतकऱ्यांच्या खरीप सोयाबीन पीक-विम्याची रक्कम जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकानी कर्ज खात्यात जमा केलली आहे. ही रक्कम विनाविलंब शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशी मागणी गुरुवारी 28 मे रोजी करण्यात आली. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी पीक-विमा प्रश्नावर बुलडाण्याच्या लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजरला दोन तास धारेवर धरले.
बँकांनी शेतकऱ्यांचा पीक-विमा रोखलाच कसा.. लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजरला स्वाभिमानीचा घेराव - बुलडाणा पीक- कर्ज न्यूज
शेतकऱ्यांच्या खरीप सोयाबीन पीक-विम्याची रक्कम जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकानी कर्ज खात्यात जमा केलली आहे. ही रक्कम विनाविलंब शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी गुरुवारी 28 मे रोजी करण्यात आली. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी पीक-विमा प्रश्नावर बुलडाण्याच्या लीड डिस्ट्रीक्ट मॅनेजरला दोन तास धारेवर धरले.
शासन निर्णय असूनही बँका शेतकऱ्यांचा पीक-विमा कर्ज खात्यात रोखून ठेवत असतील तर अशा बँक अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करा, अशीही मागणी या वेळी करण्यात आली. पीक-विम्याच्या प्रश्नावर तोडगा निघणार नाही, तोपर्यंत कार्यालय सोडणार नाही, अशी आंदोलकांनी हट्टाची भूमिका घेतल्याने वातावरण चांगलेच तापले होते. दोन दिवसात शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल, असाच तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
या लॉकडाऊनमुळे संपूर्ण व्यवहार ठप्प झाले आहेत. विम्याच्या पैशासाठी शेतकरी बँकेत चकरा घालून हैराण झाले आहेत. कोरोना रोगाच्या दहशतीच्या वातावरणात बँकांनी शेतकऱ्यांची खरीप सोयाबीन पीक-विम्याची रक्कम कर्ज खात्यात जमा करून शेतकऱ्यांवर दुहेरी संकट निर्माण केले आहे. पेरणीचे दिवस जवळ आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिक भर पडत आहे. शेतीती मशागत, रासायनिक खते, बी बियाणे, खरेदीसाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही. या महामारीच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बँकांनी शेतकऱ्यांचा पीक-विमा शेतकऱ्यांना न देता कर्ज खात्यात जमा केला हे पूर्णपणे चुकीचे आहे, असे आंदोलकांचे म्हणणे होते.
वास्तविक, २२ मे २०१९ शासन निर्णयानुसार खरीप पीक-विम्याची रक्कम कंपनीने बँकेला अदा केल्यानंतर ७ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा करणे बँकेला बंधनकारक आहे. परंतु, बँका शासन निर्णयाचे उलंघन करीत असल्याचे पूर्णपणे उघड झाले आहे. बँकांना शेतकऱ्यांची पीक-विम्याची रक्कम कर्ज खात्यात जमा करण्याची गरज नाही. त्यामुळे कर्ज खात्यात जमा केलेले शेतकऱ्यांचे पीक-विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांना तत्काळ निर्देशित करण्यात येईल, असे आश्वासन या वेळी देण्यात आले. दोन दिवसांत बँकांनी रकमेचा वाटप न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाभर आंदोलन करेल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला. या निवेदनावर स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर, घाटाखालील जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे, जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले, गणेश जुनधळे, पवन मेटांगळे, बालाजी टाले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.