बुलडाणा - कोरोनाच्या संकटामुळे सर्वत्र बंद असल्याने राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताच्या संभाव्य तुटवड्याची सार्थ भीती व्यक्त होत आहे. अशा परिस्थीतीत नागरिकांना रक्तदानासाठी साद घातली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर रविकांत तुपकर यांच्या संकल्पनेतून स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटरच्या माध्यमातून गुरुवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला प्रतिसाद देत तरुण-तरुणी, कार्यकर्ते, शेतकरी, शिक्षक, पत्रकार यासह विविध क्षेत्रातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सव्वाशेहून अधिक दात्यांनी रक्तदान करुन कोरोनाच्या या संकटकाळी आपली मदतीची भूमिका निभावली.
कोरोना संकटकाळात गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, कामगारांसाठी सर्व प्रकारच्या मदतीसाठी धावून गेलेल्या 'स्वाभिमानी' हेल्पलाईन सेंटरच्या माध्यमातून गुरुवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. चिखली रोडवरील सोसायटी पेट्रोल पंपासमोर शबनम कॉम्प्लेक्स परिसरात 'कोरोनाला हरवूया, चला रक्तदान करूया' या संदेशासह 'स्वाभिमानी'चे राज्य नेते रविकांत तुपकर यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. इतरांना उपदेश करण्यापेक्षा आधी स्वत:पासून सुरुवात करण्याचे तत्व रविकांत तुपकर यांनी जोपासले आहे. त्यामुळे रक्तदानाची सुरुवात देखील त्यांनी स्वत:पासून केली. त्यानंतर रक्तदानासाठी युवक-युवतींची अक्षरश: रांग लागली होती.
देशभरात आता कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासण्याची शंका आरोग्य प्रशासनाने व्यक्त केली. अशावेळी 'स्वाभिमानी' हेल्पलाईनने रक्तदानासाठी पुढाकार घेतला. रविकांत तुपकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत युवकांनी उत्स्फूर्तपणे या शिबिराला प्रतिसाद दिला. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीचे डॉ. ज्ञानेश्वर राऊत, सोनल राजपूत, भूषण खरे, सीमा मेश्राम, नयन वऱ्हाडे, अनिल घोडेस्वार, आत्माराम राठोड व पवार यांनी रक्तसंकलनाची जबाबदारी पार पाडली. तर, सव्वाशेहून अधिक दात्यांनी रक्तदान केले.