बुलडाणा - गेली दोन वर्षापासून देशात कोरोना साथीने थैमान घातले आहे. यामध्ये मोठ्या उद्योग व्यवसायांसह शेतऱ्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पीक-पाणी नसल्याने अगोदरच अडचणीत असलेला शेतकरी या कोरोना साथीत अणखी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातच पावसाने पाठ फिलवल्याने दुबार पेरणीवरून आता तिबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. या सगळ्या आर्थिक संकटाला कंटाळून शेतकरी दाम्पत्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्याच्या कारखेड येथील शेषराव मंजुळकार (वय 60) आणि जनाबाई मंजुळकार (वय 51) अशी आत्महत्या केलेल्या शेतकरी दाम्पत्याची नावे आहेत. या घटनेने बुलडाणा जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
एका पाठोपाठ झाला मृत्यू
शेतकरी शेषराव मंजुळकार यांची पत्नी जनाबाई यांचा गुरुवारी ८ जुलैच्या रात्री ९ वाजता तर, शेतकरी शेषराव मंजुळकार यांचा आज शुक्रवारी ९ जुलैच्या सकाळी दोन वाजताच्या सुमारास उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. या शेतकरी दाम्पत्याने बुधवारी ७ जुलैला रात्री आपल्या राहत्या घरी विष घेतले होते. त्यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.