बुलडाणा - शेतात खोदकाम करत असताना कुदळीचा फटका बसल्याने कोब्रा जातीचा साप जखमी झाल्याची घटना टाकरखेड हेलगा येथे घडली. त्यानंतर शेतकऱ्यांनी सर्पमित्रांना बोलवून त्या सापाला तत्काळ पशुचिकित्सकांकडे नेल्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शास्त्रक्रियेनंतर सापाचे प्राण वाचले असून काही दिवस त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
पोटात कुदळ लागल्याने साप गंभीर जखमी -
टाकरखेड हेलगा येथे 24 डिसेंबर रोजी लवलेश देशमुख यांच्या शेतात खोदकाम सुरू असताना त्यावेळी तीन फूट लांबीचा कोब्रा जातीचा साप निघाला. मात्र, त्याच्या पोटात कुदळ लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे देशमुख यांनी तत्काळ सर्पमित्र शाम तेल्हारकर, वन्यजीव विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी सुरवसे न्यजीव संरक्षण निसर्ग पर्यावरण समितीचे अध्यक्ष व सर्पमित्र श्रीराम रसाळ यांना कळवले. त्यांनी या सापाला लगेच पशु चिकित्सकांकडे नेले.