बुलडाणा - भाजप-सेनेचा वाद आता थांबायचे नाव घेत नाही. संजय कुटे यांनी संजय गायकवाड यांच्यावर सडकून टीका केल्यानंतर संजय गायकवाड यांनीही आमदार संजय कुटेंना खुले चॅलेंज केल्याने भाजपचे संजय कुटे थेट आज बुलडाण्यात दाखल झाले. दरम्यान, संजय कुटे परत जात असताना मलकापूर रोडवर त्यांच्या वाहनावर दगड फेक झाली. परिणामी, सर्व भाजपचे नेते थेट पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात पोहचले. जो पर्यंत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अटक केली जात नाही, तो पर्यंत इथून हलणार नाही, असा पवित्रा भाजपचे आमदार संजय कुटे, आमदार श्वेता महाले, माजी आमदार चैनसुख संचेती व माजी आमदार विजयराज शिंदे यांनी घेतला.
शिवसेना-भाजप आमदार आमने-सामने
मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर ते देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते, अशी अभद्र टीका बुलडाणा विधानसभेचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली होती. त्यावर गावातल्या मवाली सारखा आमदार म्हणत आमदार संजय गायकवाड यांच्यावर आमदार डॉ. संजय कुटे यांनी ही खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. या टीकेचा समाचार घेत संजय गायकवाड यांनी पातळी सोडून, 50 मीटरच्या आत माझ्या जवळ येऊन दाखव, असा चॅलेंज देत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे आज पुन्हा वाद उफाळून आला. दरम्यान, आमदार संजय कुटे यांनी संजय गायकवाड यांचा चॅलेंज स्वीकारून ते आज बुलडाण्यात दाखल झाले व शहरात परिक्रमा घातली.
परत जाताना आमदार कुटेंच्या वाहनावर दगडफेक
बुलडाण्यात आल्यानंतर दुपारी संजय कुटे परत जात असताना मलकापूर रोडवर काही शिवसैनिकांनी संजय कुटे यांच्या वाहनावर दगडफेक केली. यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावर आमदार संजय कुटे, आमदार श्वेता महाले, माजी आमदार चैनसुख संचेती, माजी आमदार विजयराज शिंदे, विनोद वाघ व भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पायी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. यावेळी आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.