महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सैलानी बाबा यात्रा; नारळाच्या होळीपासून महोत्सवाला सुरुवात, लाखो भाविक दाखल

बुलडाणा जिल्ह्यात सैलानी येथे असलेल्या सैलानी बाबाच्या यात्रेला बुधवारी सुरुवात झाली. या यात्रेत देशभरातून भाविक येतात.

नारळाची होळी

By

Published : Mar 21, 2019, 9:25 AM IST

बुलडाणा - देशभरातून आलेल्या भाविकांच्या उपस्थितीत हजारो नारळांच्या होळीने सैलानी बाबा यात्रेला सुरुवात झाली. या होळीला प्रदक्षिणा घालत हजारो भाविकांनी बाबा सैलानींच्या दर्ग्यावर माथा टेकविला.


सैलानी बाबांच्या यात्रेला खऱ्या अर्थाने होळीपासून प्रारंभ होतो. हजारो भाविक सोबत आणलेले नारळ होळीत टाकतात. शिवाय कपडे व इतर वस्तूदेखील होळीत दहन करतात. अंगावरुन नारळ ओवाळून होळीत दहन केल्याने भूतबाधा निघून जाते, अशी भाविकांची धारणा आहे. यात्रेत येणारा प्रत्येकजण हजरत हाजी अब्दुल रहेमान ऊर्फ सैलानी बाबांच्या दर्ग्यावर दर्शनासाठी जातो. १९९० पासून होळीच्या दहनाची परंपरा सुरू केल्याचे येथील मुजावर सांगतात. यात्रेत मनोरुग्णांना घेऊन येण्याची परंपरा आहे. मनोरुग्णांना येथे आणल्यानंतर त्यांची व्याधी बरी होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.


सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा यात्रा महोत्सवाची सुरुवात नारळाच्या होळीने झाली. दरवर्षी होळीच्या दिवशी सैलानी यात्रेला सुरुवात होत असते. हाजी अब्दुल रहेमान उर्फ सैलानी बाबा यांच्या दर्ग्यावर चादर चढवल्यानंतर नारळाच्या होळीची विधिवत पूजा अर्चा केली जाते. त्यांनतर होळी पेटवली जाते. या होळीमध्ये भाविक नारळ अर्पण करतात.


पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेचा समारोप संदल काढून 'फातीया'ने होतो. २५ मार्चच्या मध्यरात्री उंटनीवरुन सैलानी बाबाचे संदल निघणार आहे. या संदलमध्ये लाखो भाविक सहभागी होतात. सैलानी बाबा यात्रा महोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला असून राज्यभरात विविध एसटी बस आगारतून या यात्रेसाठी विशेष बस सेवेची व्यवस्था करण्यात येते.


पहिल्याच दिवशी सुमारे दीड ते दोन लाख भाविकांनी हजेरी लावल्याने यात्रा गर्दीने फुलून गेली आहे. यात्रेसाठी पोलीस, महसूल प्रशासन व एसटी महामंडळ सुविधा पुरवीत आहे. एसटी महामंडळाने यात्रेसाठी राज्यभरातील विविध आगारांमधून जादा बसची व्यवस्था केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details