बुलडाण्यात एसटी बस पैनगंगा नदीत पडता-पडता वाचली
चालकाच्या हलगर्जीपणामुळे प्रवाश्यांच्या जीवावर बेतणारी घटना आज शनिवारी 20 मार्च रोजी बुलडाण्यात घडली.
बुलडाण्यात एसटी बस पैनगंगा नदीत पडता-पडता वाचली
बुलडाणा - चालकाच्या हलगर्जीपणामुळे प्रवाश्यांच्या जीवावर बेतणारी घटना आज शनिवारी 20 मार्च रोजी बुलडाण्यात घडली. बुलडाणा-सैलानी एसटी बस सागवन जवळील पैनगंगा नदीत पडता-पडता वाचली. सुदैवाने या दुर्घटनेत जिवीत हानी झाली नाही.
बुलडाणा आगाराची बुलडाणा-सैलानी एसटी बस आज शनिवारी सकाळी पहाटे 6 वाजून 45 मिनिटाला सैलानीकडे भरधाव वेगाने बस जात होती. सागवान जवळील पैनगंगा नदीच्या पुलाजवळ गतिरोधक बघून चालकाने जोरदार ब्रेक मारला. शिवाय चालकाने हॅन्ड ब्रेक लावल्याचेही बोलल्या जात आहे. यामुळे बसचा समोरील टायरजवळील लोखंडी पाटे तुटले व बस अनियंत्रित होवून पैनगंगा नदीच्या पुलाजवळील कठडे जवळ जावून अडकली. ही बस नदीत पडता-पडता वाचली. यावेळी बसमधील 3 महिला 1 पुरुष प्रवाशी सोबत चालक व वाहकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
हलगर्जीपणा केल्याने चालकावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू-
सध्या आगाराचे सर्व एसटी बसेसचा 65 पर्यंत वेग मर्यादा बांधलेला आहे. एसटी बस चालवितांना गतिरोधकवर लक्ष ठेवून एसटी बस गतिरोधकांवर सावकाश चालविण्याच्या सूचना सर्व चालकांना देण्यात आल्या आहेत. आजच्या घटनेमध्ये चालकाने भरधाव वेगाने बस चालविली. त्यानंतर जेव्हा चालकाला गतिरोधक दिसले तेव्हा त्यांनी जोरात ब्रेक मारला त्यामुळे बस अनियंत्रित झाली. सुदैवाने या दुर्घटनेत जिवीत हानी झाली नसून कोणीही प्रवाशी जखमी झाले नाही. मात्र बस चालकावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची प्रतिक्रिया आगार प्रमुख रवी मोरे यांनी दिली.