बुलडाणा- सततच्या नापिकीने कर्जाच्या वाढत्या डोंगराला कंटाळून त्यांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर जीव वाचवण्यासाठी पैसा नसल्यानं डॉक्टरांनी उपचारच थांबवले. डॉक्टरने उपचार थांबवल्याने घराचा आधार डोळ्यादेखत कोलमडून पडला. सारं जग पोरकं झालं, कुटूंब उघड्यावर आलं. पण, कोणाला त्याचं काहीच सोयरं सूतक नव्हतं. ही काही एखाद्या चित्रपटाची कथा नाही. तर हे वास्तव आहे मूर्ती गावातील कर्जाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या शेतकरी सुभाष खराटेंचं.
शेतकऱ्यांनं जगावं की मरावं? आत्महत्याग्रस्त खराटे कुटुंबीयांचा मन हेलावून टाकणारा प्रश्न - शेती
कर्जाला कंटाळून मूर्ती गावातील सुभाष खराटे या शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पैसे नसल्याने डॉक्टरांनी त्यांचा उपचार थांबवल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या मुलाने केला.

खराटे यांच्याकडे साडेतीन एकर ओलीती शेती आहे. पीक कर्जासाठी महाराष्ट्र बँकेचे 1 लाख 20 हजार, सस्टेनेबल अॅग्रो-कामर्शिल फायनन्सचे 1 लाख 20 हजार तर सावकाराकडून 40 हजार रुपयांचे कर्ज सुभाष खराटेंनी घेतले होते. मात्र, सततच्या नापिकीमुळे डोक्यावर कर्जाचे ओझे वाढल्याने सुभाष खराटे यांनी विष पिऊन 18 ऑगस्टला आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांचा जीव वाचविण्यासाठी गावकऱ्यांनी त्यांना उपचारासाठी बुलडाण्यातील डॉ. मेहेत्रेंच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर मात्र 28 ऑगस्ट 2018 रोजी मेहेत्रे रुग्णालयाकडून साध्या कागदावर 1 लाख 7 हजार रुपयांचे रुग्णालयाचे आणि 45 हजार रुपयांचे औषधांचे बिल लिहून दिले. त्यावेळी डॉक्टर मेहेत्रेंना आयसीयूमध्ये भेटून माझ्या आईने आमच्याकडे एव्हढे पैसे नाहीत, म्हणून माझ्या बाबाला सुट्टी द्या, आम्ही त्यांना सरकारी रुग्णालयात भरती करतो, असे सांगितले. त्यावर डॉक्टरांनी माझ्या आईला आयसीयूमध्येच पूर्ण पैसे भरण्यासाठी सांगितले. मी आणि माझ्या आईने डॉक्टर मेहेत्रेंना पैसे नसल्याचे सांगत सुट्टी देण्याची वारंवार विनंती केली. मात्र, पैसे नसल्याने डॉक्टरांनी माझ्या वडिलांचा 28 ऑगस्टपासून उपचार थांबविल्याचा आरोप समाधानने केला.