बुलडाणा : शहरात विविध महापुरुषांचे स्मारक उभारण्यासाठी जागेची मागणी नगरसेवकांनी केल्यानंतर यावर ठराव घेण्यासाठी आयोजित विशेष सभाच कोरमअभावी रद्द झाली आहे. सभेसाठी आवश्यक कोरम पूर्ण न झाल्याने ही सभा रद्द झाल्याचे स्वीकृत नगरसेवक मो. सज्जाद यांनी सांगितले. तर काँग्रेसने मात्र यावरून आरोप केला आहे.
कोरम पूर्ण न झाल्याने नगर परिषदेची विशेष सभा रद्द - BULDANA
सभेसाठी आवश्यक कोरम पूर्ण न झाल्याने ही सभा रद्द झाल्याचे स्वीकृत नगरसेवक मो. सज्जाद यांनी सांगितले. तर काँग्रेसने मात्र यावरून आरोप केला आहे.
शहरातील जयस्तंभ चौकातील व्यापारी संकुलसाठी आरक्षित असलेली नझुल शीट क्र.9 बी मधील भूखंड क्र 85 मधील जागा महापुरूषांच्या स्मारकासाठी द्यावी या मागणीसाठी सामाजिक संस्थेसोबत काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादीच्या नगरसेवक-नगरसेविकांनी मागणी केली होती. यावर बुलडाणा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा नजमुन्नीसा मो.सज्जाद यांनी ठराव घेण्यासाठी गुरुवारी 8 एप्रिल रोजी ऑनलाईन विशेष सभेचे आयोजन केले होते. या ऑनलाईन सभेत नगराध्यक्षांसह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भारिप बहूजनचे एक-एक आणि भाजपचे 2 नगरसेवक-नगरसेविकांनी उपस्थिती लावली. तर उर्वरित नगरसेवक सभेला उपस्थित नव्हते. त्यामुळे सभेचा कोरम पूर्ण न झाल्याने ही सभाच रद्द करण्यात आली.
स्मारकाला जागेसाठी उपोषण
शहरातील सम्राट संघटनेचे आशीष खरात यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी जयस्तंभ चौकातील व्यापारी संकुलासाठी आरक्षित असलेली जागा देण्याची मागणी करत बुलडाणा नगर परिषदेसमोर उपोषण केले होते. नगराध्यक्षा नजमुन्नीसा यांनी आशीष खरात यांना जागेसंदर्भात विशेष सभा बोलवून ठराव घेण्याचे आश्वसन दिले होते. त्यानंतर खरात यांनी उपोषण मागे घेतले होते. दरम्यान, इतर महापुरुषांचे स्मारक उभारण्यासाठीही या जागेची मागणी करण्यात आलेली होती.
विशेष सभा बोलाविल्याचा आरोप
नगराध्यक्षांनी सर्वसाधारण सभा बोलवायला पाहिजे होती. जेणेकरून त्याला 9 चा कोरम आवश्यक असतो. परंतु नगराध्यक्षांनी मुद्दाम विशेष सभा बोलावल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता काकास यांनी केला.
नेटवर्क मिळाल्याचे गैरहजर, काँग्रेस नगरसेवकाचे स्पष्टीकरण
सभा ऑनलाईन असल्याने कुठूनही हजर राहता येईल म्हणून खासगी कामासाठी बाहेरगावी गेलो होतो. मात्र नेटवर्क न मिळाल्याने सभेत हजर राहता आले नाही असे स्पष्टीकरण नगर परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आकाश दळवी यांनी दिले आहे.