बुलडाणा- आषाढी एकादशीनंतर शेगावकडे परतीच्या प्रवासाला निघालेल्या संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवरील किनगावराजा येथे आगमन होताच भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. येत्या ८ ऑगस्टला श्रींची पालखी माहेरी म्हणजेच शेगावी पोहचणार असून या पालखीसोबत २ लाखांच्या जवळपास भाविक संतनगरीत दाखल होणार आहेत.
श्री संत गजानन महाराजांची पालखी बुलडाणा जिल्ह्यात दाखल, ८ ऑगस्टला शेगावी होणार दाखल आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात होणाऱ्या उत्सवात सहभागी होण्यासाठी विदर्भाची पंढरी श्री संत गजानन महाराज यांची पालखी दरवर्षीप्रमाणे पंढरपूरला गेली होती. दोन महिन्यांच्या पायी प्रवासानंतर ही पालखी सोमवारी बुलडाणा जिल्ह्यात दाखल झाली आहे. पालखीचे आज आगमण होणार असल्याने पंचक्रोषीतील भाविकांनी पालखीच्या स्वागतासह दर्शनासाठी पालखीमार्गावर सकाळपासूनच हजेरी लावली होती. विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवर पालखी पोहचताच पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी, टाळ -मृदंगाचा गरज आणि 'जय गजानन'च्या जयघोषात पालखीतील वारकऱ्यांचे जिल्ह्यात स्वागत करण्यात आले.
पालखी मार्गावर पोलीस प्रशासनाच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. पालखीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी स्वागत कमानी, भगव्या पताका लावण्यासह रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. पालखीचे किनगाव राजावरून सिंदखेड राजात आगमण होताच ठिकठिकाणी स्वागत व पूजन करण्यात आले. शहरातील भाविकांसह पंचक्रोषीतील हजारो भाविक सिंदखेड राजात पालखीच्या स्वागतासह दर्शनासाठी दाखल झाले होते, त्यामुळे सिंदखेड राजा नगरी भक्तीरसात चिंब झाली होती. पालखीसोबत ५५० वारकरी, तीन अश्व, ९ वाहने तसेच जिल्ह्याच्या सीमेपासून शेकडो भाविक या वारीत सहभागी झाले आहेत. यावेळी असंख्य भाविकांनी जिल्ह्याच्या सीमेवर पालखीचे स्वागत करुन 'श्रीं'चे दर्शन घेतले. .
आज पालखीचा मुक्काम बीबी येथे होईल. बुधवारी लोणार तर, १ ऑगस्टला मेहकर, २ ऑगस्टला जानेफळ, ३ ला शिर्ला नेमाने, ४ ला आवार आणि ५ ऑगस्टला पालखी खामगावात पोहचेल. खामगावातील मुक्कामनंतर ६ ऑगस्टला पहाटे पालखी स्वगृही शेगावकडे निघणार आहे. यावेळी जिल्हाभरातील लाखांच्यावर भाविक पालखीसोबत खामगाव ते शेगाव पायीप्रवास करतात. त्यासाठी परिसरातील भाविक ५ ऑगस्टलाच खामगावात दाखल होत असतात. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही भाविकांनी खामगाव ते शेगाव पालखीसोबतच्या पायी प्रवासाचे नियोजन केले आहे.