बुलडाणा -जिल्ह्यातील शेगाव येथील साईबाई मोटे रुग्णालयाचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. कोरोना रुग्णांना संस्थात्मक विलगिकरनात ठेवण्याचे सरकारचे आदेश आहेत. मात्र या रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झालेल्या कोरोना संक्रमित महिलेला प्रसुतीनंतर सुटी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान ही घटना लक्षात आल्यानंतर आता रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सारवासारव करण्यात येत आहे. विशेष म्हणजे सुटी दिल्यानंतर ही महिला अनेकांच्या संपर्कात आल्याने, आता आरोग्य विभागाची धावाधाव सुरू झाली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह महिलेला रुग्णालयातून सुटी 200 ते 250 जणांच्या संपर्कात आली महिला
दरम्यान घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बुलडाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यातील एकलारा येथील एक महिला 15 फेब्रुवारीला शेगाव येथील साईबाई मोटे रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झाली होती. 16 फेब्रुवारीला या महिलेची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यानंतर काही वेळातच या महिलेची प्रसुती झाली, प्रसुतीनंतर या महिलेला सामान्य वार्डमध्ये पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. या महिलेचा कोरोना अहवाल 19 फेब्रुवारीला प्राप्त झाला, त्यामध्ये ही महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. मात्र तरीदेखील या महिलेला 20 फेब्रुवारीला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सुटी मिळाल्याने ही महिला आपल्या गावी गेली, त्यानंतर ती तब्बल 200 ते 250 जणांच्या संपर्कात आल्याची माहिती समोर येत आहे. ही महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे लक्षात येताच रुग्णालय प्रशासनाला हादर बसला, त्यांनी तातडीने फोन करून या महिलेच्या पतीला याची माहिती दिली. मात्र तोपर्यंत बराच वेळ झाला होता, दरम्यान आता ही महिला ज्या- ज्या व्यक्तींच्या संपर्कात आली त्यांचे स्वॅब घेण्यासाठी आरोग्य विभागाची धावाधाव सुरू झाली आहे.
संस्थात्मक विलगिकरणाचे आदेश
दरम्यान आपली चूक लक्षात आल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ या महिलेच्या घरी जाऊन, ती घरीच विलगिकरन कक्षात राहत असल्याचे तिच्याकडून लिहून घेतले आहे. मात्र विदर्भात वाढत असलेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी संस्थात्मक विलगिकरणाचे आदेश देऊन, गृह विलगिकरणाचे आदेश रद्द केले आहेत.