बुलडाणा- शेगावच्या रेल्वे स्थानकावर १९५० साली तयार करून विकण्यात आलेली कचोरी सुरुवातीला २ आण्याची मिळायची. पुढे ५ पैसे आणि यानंतर टप्प्या-टप्प्याने आणि बदलत्या महागाईच्या काळात आता ही कचोरी ७ रुपयाची झाली आहे. शेगावचा ब्रँड म्हणून ओळख असलेल्या आणि आयएसओ मानांकन मिळालेल्या या कचोरीचे दर वाढत चालले आहेत. मात्र, तिच्या लज्जतदार चवीमुळे खवय्यांची संख्या कमी होताना दिसत नाही.
संत नगरी शेगाव येथील श्री. संत गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर अनेकांची पावले शेगाव कचोरी सेंटरकडे वळतात. १९५० साली देशाच्या फाळणीनंतर पंजाबमधून शेगावात आलेल्या तिरथराम शर्मा यांनी शेगाव येथे कचोरी सेंटरची स्थापन केले होती. गेल्या ६९ वर्षात ही कचोरी जगभरात पोहचली असून शेगाव कचोरी हा आता ब्रँड बनला आहे. स्वादिष्ट पदार्थांची आवड असणाऱ्या खवय्यांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या शेगाव कचोरीला गुणवत्तेसाठी आयएसओ ९००१;२००८ मानांकन प्राप्त झाले आहे. शेगावच्या रेल्वे स्थानकावर उतरताच खमंग कचोरी खाण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. शेगावची ही कचोरी हळूहळू विदर्भातच नव्हे तर आता संपूर्ण देशासह परदेशात देखील पोहोचली असून सुमारे ६९ वर्षांचा प्रदीर्घ पल्ला या कचोरीने गाठला आहे.
१९५० साली केली कचोरी सेंटरची स्थापना
५ जून १९५० रोजी कचोरी सेंटर स्थापन करून तिरथराम शर्मा यांनी कुटुंबीयांना कायमस्वरूपी कचोरी व्यवसायाचा मंत्र दिला. यामधे त्यांनी रेल्वे स्टेशनवरील एका स्टॉलवर हॉटेल सुरू केले. १९५० मध्ये आपल्या मुलांच्या मदतीने त्यांनी खास पद्धतीने तयार केलेल्या कचोरीची विक्री सुरू केली. शेगावला संत गजानन महाराजांच्या समाधी दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला या कचोरीने भूरळ घातली आहे. त्यांच्या पुढच्या पिढीने कचोरी निर्मिती आणि विक्रीचा वारसा यशस्वीपणे चालविला असून एकेकाळी एका आण्याला विकणारी ही कचोरी आज ७ रुपये एवढ्या किमतीला विकली जात आहे.
सुरुवातीला ही कचोरी २ आण्याची मिळायची. मात्र, त्यांनतर काळानुरुप किंमत बदलली असली तरी कचोरी मात्र तीच आहे. त्यामुळेच जे भाविक गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला येतात ते कचोरीच्या लज्जतदारपणामुळे तिची चव घेण्याचा मोह आवरू शकत नाही. आजवर जपलेली कचोरीची गुणवत्ता आणि तिच्या यशाबाबत बोलताना तिरथराम शर्मा यांचे नातू गगन शर्मा यांनी सांगितले की, दर्जेदार बेसन आणि मैद्याच्या वापराबरोबरच कचोरी बनवताना एका विशिष्ट प्रकारचा मसाला ते आजवर वापरत आले आहेत. परिणामी कचोरीचा दर्जा टिकून राहिला असून त्यामुळे शेगावचे नाव प्रसिद्ध होत असल्याने हेच खरे समाधान असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. एक प्रकारे खाद्यप्रेमींच्या जिभेचे चोचले पुरवणारी टी.आर. शर्मा यांच्या हातची चव घेऊन आलेली कचोरी या घटकेला अनेकांचे पोट भरण्याचेही साधन ठरली आहे.
कचोरी हा शेगावचा एक प्रतिष्ठित ब्रँड