बुलडाणा - केंद्र सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शन बाबतचे धोरण आपल्या हातात घेतल्यानंतर 21 एप्रिल पासून ते 30 एप्रिल पर्यंत 2 लाख 68 हजार, नंतर 4 लाख 35 हजार इंजेक्शन देण्यात आली होती. मात्र, आता अन्न औषध प्रशासनाच्या पाठपुराव्यानंतर आता 21 एप्रिल ते 9 मे पर्यंत 8 लाख 9 हजार 500 रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा राज्याला केंद्राकडून नवीन आदेशाने टप्याटप्याने पुरवला जाणार असून हा साठा लवकरच मिळणार असल्याची माहिती अन्न औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी बुलडाण्यात दिली. पुढच्या काळात राज्याला रेमडेसिवीर इंजेक्शन वाढवून देण्याची राज्य शासनामार्फत मागणी केंद्र सरकारला केली आहे. ते खरीप हंगामाच्या पीक कर्जाबाबत जिल्ह्यातील खासदार व आमदरांसोबत झालेल्या ऑनलाईन बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी शंकर रामामुर्थी, जिल्हा कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, जिल्हा कृषि विकास अधिकारी अनिसा महाबळे उपस्थित होत्या.
राज्याला दुसऱ्या टप्यात मिळणार 8 लाख 9 हजार 500 रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा - डॉ.राजेंद्र शिंगणे ऑक्सिजन व रेमडेसिवीर बाबत अन्न व औषध प्रशासन जागरूक -
महाराष्ट्रामध्ये कोरोना बाधित अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 7 लाखाच्यावर गेली आहे. ही रुग्ण संख्या 7 लाखाच्यावर गेल्यामुळे महाराष्ट्र आरोग्य व्यवस्थेवर फार मोठा ताण येत आहे. या बाबत मंत्री शिंगणे म्हणाले की, विशेषता ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये आणि रेमडेसिवीर इंजेक्शनच्या बाबतीमध्ये अन्न व औषध प्रशासन विभाग हा मागचे काही दिवस अतिशय जागरूक राहून राज्यांमधील गरजूंना ऑक्सिजन मिळाला पाहिजे आणि रेमडेसिवीर इंजेक्शन मिळायला पाहीजेत यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहत आहे.
राज्यात प्रतिदिवस तयार होतो साडेबाराशे मेट्रिकटन ऑक्सिजन -
आपल्या राज्यात प्रतिदिवस जवळपास साडेबाराशे मेट्रिक टन ऑक्सिजन आपण आपला स्वतःचा तयार करतो. केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध भागातून ऑक्सिजनच्या मिळतो, गुजरात, भिलाई छत्तीसगड, बेल्लारी कर्नाटक, हैदराबाद तेलंगणा या भागातून आपण ऑक्सिजन मिळवण्याचा प्रयत्न करतोय. कालपर्यंत 1 हजार 736 मेट्रिक टन ऑक्सिजन आपण वितरित करण्याचा प्रयत्न केल्याचे डॉ.शिंगणे म्हणाले.