बुलडाणा- कोरोनाच्या काळात मेहकरवरुन गुजरातला अवैधपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बसवर आरटीओने कारवाई केली. बुलडाणा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक यांनी बसमधील प्रवासी उतरवून लक्झरी ताब्यात घेतली आहे. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली.
परराज्यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बसवर आरटीओची कारवाई - बुलडाण्यात लक्झरी बसवर आरटीओची कारवाई
मेहकरवरुन गुजरातला अवैधपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बसवर आरटीओने कारवाई केली. प्रवासी वाहतुकीला बंदी असतानाही ही बस मेहकर येथून १५ प्रवाशी घेऊन सूरतला निघाली होती. मात्र लक्झरी बसला गुजरात राज्यात जाण्यासाठी कुठलीच परवानगी नसल्याचे आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या प्रवासी वाहतुकीला बंदी आहे. तरीही मेहकरवरुन गुजरातमधील सूरतला 15 प्रवासी घेऊन निघाली होती. या प्रवाशांना नेताना कोणतीच परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे या बसला येळगाव टोल नाक्यावर मोटार वाहन निरीक्षक संदीप पवार यांनी अडवले. यावेळी या लक्झरी बसची तपासणी केली असता, बसमध्ये बसलेल्या प्रवाशांजवळ मेडीकल प्रमाणपत्र होते. मात्र लक्झरी बसला गुजरात राज्यात जाण्यासाठी कुठलीच परवानगी नसल्याचे आढळून आले.
सूरत येथील महेंद्रा ट्रॅव्हल्सची लक्झरी बस क्र. ( जीजे 17 डबल यु 0317 ) सूरत येथून परवानगीने मेहकर येथे प्रवासी सोडण्यासाठी आली होती. मात्र परत गुजरात येथे जाताना प्रवासी घेऊन जाण्याची परवानगी नसतानाही मेहकरवरून-सुरत येथे जात होती. यात मेहकर येथून 15 प्रवासी घेवून जाताना या बसला तपासण्यात आले. दरम्यान बसमधील प्रवाशांना बुलडाणा शहर बसस्थानकांवर उतरवून लक्झरी बसला ताब्यात घेण्यात आले. बसला एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेत लावण्यात आली आहे. लक्झरी बसवर पुढील कारवाई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयतर्फे करण्यात येणार आहे. जिल्हाबाहेर, परराज्याबाहेर जाण्यासाठी इ परवानगीनेच प्रवास करण्याचे आवाहन मोटार वाहन निरीक्षक संदीप पवार यांनी केले आहे.